बाळा नर यांच्या प्रभाग ७७मध्ये सर्वाधिक स्पर्धा
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुतीसाठी प्रतिष्ठेची, तर उबाठा आणि मनसेसाठी अस्तित्वाची लढत मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष उमेदवार निवडीत सावध भूमिका घेत असून, जोखीम टाळण्यासाठी माजी नगरसेवकांना प्राधान्य देण्याची रणनीती आखली जात आहे. मात्र जे नगरसेवक विधानसभेत आमदार म्हणून पोहोचले आहेत, त्यांच्या रिक्त जागांवर इच्छुकांची रांग लागली आहे. मुंबईतून २०१९ मध्ये पाच, तर २०२४ मध्ये तीन असे एकूण सात नगरसेवक आमदार झाले. या आमदारांचा उत्तराधिकारी कोण? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतून १८ हून अधिक माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र यश फक्त तिघांना मिळाले. उबाठाचे मनोज जामसुतकर (भायखळा), अनंत उर्फ बाळा नर (जोगेश्वरी पूर्व) आणि शिवसेनेचे मुरजी पटेल (अंधेरी पूर्व) हे तिघे माजी नगरसेवक आमदार झाले. यापूर्वी २०१९ मध्ये आमदारकी मिळवलेले यामिनी जाधव आणि रमेश कोरगावकर यांचा २०२४ मध्ये पराभव झाला, तर पराग शाह, दिलीप लांडे आणि रईस शेख यांनी आमदारकी कायम ठेवली.
२०१२ मध्ये काँग्रेसकडून भायखळ्यातून नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या मनोज जामसुतकर यांचा मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्याने, २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी पत्नी सोनम जामसुतकर यांना वॉर्ड क्रमांक २१० मधून नगरसेविका म्हणून निवडून आणले होते. पुढे २०२४ च्या विधानसभेत काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने जामसुतकर उबाठात दाखल झाले आणि विजय मिळवला. आता त्यांचा पारंपरिक प्रभाग पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने सोनम जामसुतकर याच उबाठाकडून उमेदवार म्हणून मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
बाळा नर यांच्या जुन्या प्रभागात स्थिती काय?
शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांचा पराभव करीत उबाठाचे अनंत उर्फ बाळा नर हे जोगेश्वरी पूर्वमधून आमदार झाले. त्यांचा प्रभाग ७७ आता महिला राखीव झाला आहे. उबाठाकडून शिवानी शैलेश परब या प्रमुख इच्छुक आहेत. याशिवाय विश्वनाथ सावंत आणि नंदकुमार ताम्हणकर हे आपापल्या पत्नींना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. दुसरीकडे शिवसेनेत प्रियंका आंबोळकर, रचना सावंत आणि प्राजक्ता सावंत यांची नावे चर्चेत आहेत. या प्रभागात उबाठा विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत अपेक्षित आहे.
मुरजी पटेल मुलीला मैदानात उतरवणार?
ऋतुजा लटके यांचा तब्बल २५ हजार ४६८ मतांनी पराभव करीत शिवसेनेचे मुरजी पटेल अंधेरी पूर्वमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१७ मध्ये ते भाजपच्या तिकिटावर प्रभाग ८१ मधून, तर त्यांच्या पत्नी केशरबेन पटेल प्रभाग ७६ मधून नगरसेवक झाल्या होत्या. आता पत्नी केशरबेन पटेल यांना शिवसेनेकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच प्रभाग ८१ हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने मुरजी पटेल आपल्या मुलीला उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.






