२०२५ वर्षात काय कमावले, काय गमावले

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर


मानवी जीवनात प्रत्येक वर्ष हे अनुभवांचे दालन उघडते. २०२५ हे वर्षही तसेच अनेक शिकवण देऊन गेले. या वर्षात काही गोष्टी कमावल्या, तर काही गमावल्या; परंतु या दोन्हींचा जीवनावर खोल परिणाम झाला.


२०२५ मध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अनुभवांची शिदोरी कमावली. जीवनातील चढ-उतारांना सामोरे जाताना संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार करण्याची सवय लागली. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढल्या, परंतु त्याचबरोबर कार्यकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि निर्णयक्षमता विकसित झाली. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा वाढला आणि माणसांची खरी किंमत कळली.


या वर्षात ज्ञानाचीही भर पडली. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळाली, चुका झाल्या पण त्यातून धडे घेतले. स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलली आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास बसला. आरोग्य, कुटुंब आणि मानसिक शांतता यांचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवले. मात्र, कमावण्याबरोबर काही गोष्टी गमावल्याही. धावपळीच्या जीवनात वेळ हातातून निसटला. काही जुनी नाती दूर गेली, काही स्वप्ने अपूर्ण राहिली. अपेक्षाभंग आणि अपयश यांचा सामना करावा लागला; परंतु या गमावलेल्या गोष्टींनीच मला अधिक परिपक्व बनवले.


एकूणच २०२५ हे वर्ष शिकवण देणारे ठरले. कमावलेले अनुभव आणि गमावलेल्या गोष्टी यांचा समतोल साधत पुढे जाण्याची उमेद मिळाली. प्रत्येक वर्ष आपल्याला काहीतरी देऊन जाते आणि काहीतरी घेऊन जाते; महत्त्वाचे म्हणजे त्यातून आपण काय शिकतो, हेच खरे यश आहे.


नवीन वर्ष २०२६ आपल्यासाठी नव्या आशा, नवी स्वप्ने आणि नवे संकल्प घेऊन येवो. मागील वर्षातील अनुभवांतून शिकत, चुका मागे ठेवून आत्मविश्वासाने पुढे जाण्याची ताकद आपल्याला लाभो. परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर प्रत्येक दिवस अर्थपूर्ण ठरो. आरोग्य, समाधान आणि यश यांची साथ मिळो आणि आपण स्वतःसह इतरांच्या आयुष्यातही आनंद पसरवू या. नवीन वर्ष २०२६ सर्वांसाठी सुख, शांती आणि प्रगती घेऊन येवो. ही शुभेच्छा !


खरं तर कुठलाही संकल्प मनात येताच सोडायला पुढे व्हायला हवं. आपण बहुतेक जण नव्या वर्षाची सुरुवात करताना उत्साहाने नवा निर्धार, नवा संकल्प करतो. पण - एकीकडे जुन्या वर्षाला निरोप देताना अनेक इच्छा, संकल्प, कामं अपुरी राहिली याबद्दल खंत असते, खरं ना! यंदा असं होऊ नये म्हणून तुम्ही आरंभीच काळजी घ्यायला हवी. मागे वळून पाहा, थोडा विचार करा. आपलं वय, कल, आवड-नावड, क्षमता, हाती असलेला वेळ या साऱ्यांचा विचार करून मगच दृढ संकल्प करा. निश्चित ध्येय हवं, योग्य कृती हवी.


(१) यंदा मी शरीर कमावण्यासाठी रोज नेमाने व्यायाम करीन.
(२) मैदानावर नियमित खेळून मी उत्तम खेळाडू होईन.
(३) मी माझ्या आवडीच्या कलेत प्रावीण्य मिळवीन.
(४) मी रोज पाच इंग्रजी शब्द पाठ करीन.
(५) शाळेत पाचच्या आत नंबर आणीन.
(६) माझे दोष काढून टाकून गुणांचा संचय करीन.
(७) सर्वांशी प्रेमाने वागीन, मोठ्यांचा योग्य मान राखीन.
(८) मी पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त अन्य पुस्तकेही जास्तीत जास्त वाचीन.
(९) गीतेचा अध्याय पाठ करीन.
(१०) मी रोज एक सत्कर्म करीन.
(११) रोज नेमाने एक तरी घरकाम करीन.
(१२) या वर्षात मी शहराची, देशाची, चालू घडमोडींची माहिती मिळवीन.
(१३) रिकाम्या वेळेचा सदुपयोग करीन.


हेच असे कितीतरी संकल्प आहेत की त्या संकल्पाची पूर्ती करणं आवश्यक आहे. खाणं-पिणं, मजा करणं, नाच-गाणं, फिरणं, सवंगड्यांशी गप्पा करणं, फटाके वाजवणं म्हणजे का नव्या वर्षाचं स्वागत करणं? क्षण येतो अन् जातो, हाती गवसत नाही. वर्ष येतं अन् शेवटी सरतंही - आपले हात कोरडेच राहतात, ओंजळ रितीच राहते. वेळ सत्कारणी लागावा, जीवन यशस्वी व्हावं म्हणून तर लहानपणापासून छोट्या छोट्या संकल्पांची अन् त्यांच्या पूर्तीसाठी प्रयत्न करायची सवय लावून घ्यायला हवी.


नववर्षाच्या सुरुवातीलाच गुढी उभारा संकल्पाची! कधी करता संकल्प? काय म्हणता? उद्या! छे, आजचं काम उद्यावर टोलवायचं नाही! तुम्हाला ठाऊक आहे ना,


कल करे सो आज कर ।
आज करे सो अब ॥
क्षण में प्रलय होयेगी ।
बहुरि करेगा कब ?


जो उद्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला. आला क्षण आपला, पुढच्या क्षणाचा काय भरवसा? म्हणून आज नव्हे, आताच मनाशी संकल्प करा. मग काय गंमत होते ते पाहा. मनात योजलेला संकल्प पूर्ण होईपर्यंत तुम्हाला जरा ही चैन पडणार नाही. एक संकल्प सिद्ध झाला की दुसरा संकल्प सुचू लागतो. मुंगीने बघा, चिवचिवणाऱ्या चिमणीने बघा. एकेक कण, एकेक दाणा वेचण्यात कशा गर्क होतात त्या दोघी! कंटाळा नाही, थकणं ठाऊक नाही, आळस नाही, निराशाही येत नाही त्यांच्या मनात! नो आराम, फक्त काम, काम आणि काम हाच मंत्र घोळवत त्या संकल्पसिद्धीसाठी सतत प्रयत्न करतात. बहिणाबाईंनी आपल्याला सांगितलं आहे ना,“मनाची एकाग्रता प्रार्थनेने साधते; म्हणून नेमाने सकाळ-संध्याकाळ मनापासून प्रार्थना करा.”

Comments
Add Comment

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावर...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा

भाषणाची भीती

कथा : रमेश तांबे  एक होता राजा. त्याच्या राज्याचा एक नियम होता की जो कोणी चोर सापडेल त्याला भुकेलेल्या सिंहाच्या

सूर्य पूर्वेकडेच का उगवतो?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन्ही बहिणी खूपच चौकस होत्या. सुट्टीनिमित्ताने त्यांची प्राध्यापिका

आकाश रात्री काळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने

मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात

रिॲलिटी शो

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘रिॲलिटी शो’ म्हणजे शुद्ध मराठीत वास्तविकतेचे दर्शन. म्हणजेच सत्य परिस्थिती