जीवनगंध : पूनम राणे
आरव नावाचा एक मुलगा होता. सावळ्या रंगाचा. स्वभावाने नम्र. दिसायला ओबडधोबड. उंची कमी सडपातळ बांधा. काठावर पास होणारा. अभ्यासात विशेष रस नसलेला. मधल्या सुट्टीची घंटा होताच शाळेच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाखाली जाऊन एकटाच बसायचा. काहीतरी गाणं गुणगुणायचा. शाळेतील शिक्षक त्याच्यावर कित्येक वेळा खूप रागवायचे. पण काही कालावधीतच शिक्षकांना समजून चुकले होते की त्याचा कल वेगळ्या दिशेने आहे. आरव दहावीच्या वर्गात शिकत होता. दहावीची परीक्षा जवळ आली होती. सगळेजण त्याला सांगायचे आरव, अभ्यास कर; परंतु आरव कितीही वेळ अभ्यासाला बसला तरी अभ्यास काही त्याच्या लक्षात राहत नसे. अखेर परीक्षा जवळ आलीच. आरव परीक्षेला जाऊन आला. मात्र प्रत्येक दिवशी तो खिन्न दिसायचा. त्याला त्याचा रिझल्ट चांगलाच ठाऊक होता. पेपर देऊन झाल्यानंतर तो घरी येऊन तंतुवाद्य वाजवत बसायचा आणि गाणं गुणगुणायचा.
अखेर परीक्षा संपली. दहावीचा निकालही जाहीर झाला. ठरल्याप्रमाणे आरव जेमतेम काठावर पास झाला होता. त्याला जेमतेम ३७ टक्के मार्क पडले होते. आपल्या वडिलांना त्यांनी मार्कलिस्ट दाखवली. त्याचे वडीलही खूप समजदार होते. त्यांनी तत्काळ पेढ्याचा पुडा आणला आणि आपल्या मुलाच्या हातावर ठेवत म्हणाले,” हे बघ, आरव, हे पेढे गणपती बाप्पाला दाखव.”
आरवला आश्चर्य वाटले, त्याने पेढ्याचा पुडा गणपती बाप्पा जवळ ठेवला. नमस्कार केला आणि आई-बाबांनाही नमस्कार केला. बाबांनी एक पेढा आरवला भरवला आणि म्हणाले, “हे बघ बेटा, तुझ्या वर्गातील मुलांना भले ९५%, ९६% मिळाले असतील. पण तुझ्यामध्ये जो विशेष गुण आहे, जो छंद आहे, त्याची जोपासना कर.” कदाचित वर्गातील ९५- ९६% मिळालेले विद्यार्थी उद्या डॉक्टर, इंजिनीअर होतील. ते कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये काम करतील; परंतु तुझ्यातील गायनाची कला इतकी वाढव की, एक दिवस उत्कृष्ट गायक म्हणून म्हणून सर्व जग तुला ओळखेल.
आपल्या बाबांनी आपलं बलस्थान ओळखलं आहे याची जाणीव आरवला झाली. त्याला अत्यंत आनंद झाला. त्याने गायन कला अवगत केली. स्टेजच्या कार्यक्रमासाठी त्याला विविध ठिकाणांवरून आमंत्रण येऊ लागले.
जगातील नामवंत गायक म्हणून त्याचे नाव दिमाखाने जागोजागी गाजू लागले. ज्या शाळेत तो शिकला, त्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा प्रमुख पाहुणा म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम पाहून आरव भारावून गेला होता. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्याने एक गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकून घेतली. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट प्रेक्षकांनी केला. आरवने भाषणात सांगितले की, विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वराने दिलेली उंची, रंग रूप आपल्याला बदलता येत नाही, मात्र आपल्या कर्तुत्वाने आपलं व्यक्तिमत्त्व फुलवता येतं.” आपले बलस्थान ओळखा. आपल्यामध्ये असणारी कला जोपासण्याचा प्रयत्न करा.” कला आपल्याला जीवन कशासाठी जगायचं हे शिकवते.
पालक आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे बलस्थान ओळखतात त्यांना वेळीच मार्गदर्शन करीत असतात. आज माझ्या या यशामध्ये माझ्या कलेचा तसेच आई-वडील व शिक्षकांचा मोठा वाटा आहे. त्यांचा मी शतशः ऋणी आहे. आई-वडील आणि शिक्षकांना त्याचा खूप अभिमान वाटला.
तात्पर्य :- आपल्या अपेक्षा आपल्या मुलांवर न लादता मुलांचे बलस्थान ओळखून त्याला प्रोत्साहन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात मुले झोकून करतील व आकाशाला गवसणी घालतील.