Saturday, December 27, 2025

आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही...

आला वसंत देही,  मज ठाऊकेच नाही...

डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे एक हुरहूर लावणारा काळ असतो. वर्ष संपत आलेले, वर्षाच्या सुरुवातीला केलेले अनेक संकल्प पूर्ण झाले नाहीत याची सतत चुकचुकत राहणारी रुखरुख, बाहेर थंडीचा कडाका आणि सगळीकडे सुरू असलेली पानगळ या सगळ्यांमुळे मनावर एक वेगळीच उदासी येत असते. तसा कोणत्याची गोष्टीचा अंत दु:खदच असतो. काहीतरी संपते आहे, हातातून सुटते आहे ही जाणीव आपल्याला अस्वस्थ करत असते. शेवटी आपण ‘आयुष्य, आयुष्य’ म्हणतो ते तरी काय असते? अशाच सरून गेलेल्या वर्षांची केलेली गोळाबेरीजच ना?

तशी एकंदर जगाची रचनाच अशी आहे की सगळे परत परत वर्तुळाकारपणे घडत राहते. वसंत ऋतूनंतर जीवाची काहिली करणारा ग्रीष्म, त्यानंतर थंडावा शिंपडत येणारी वर्षा, नंतर शांत चिंतनशील शरद, मग हेमंत, त्यापाठोपाठ शिशिर मग पुन्हा वसंत, हे असे सुरूच असते. शांताबाई शेळके यांनी एका गीतात म्हटल्याप्रमाणे -

“शिशिर नेतो हिरवी पाने, झाड उभे हे केविलवाणे, वसंत येता पुन्हा आगळा साज तयावर चढे, सारखा काळ चालला पुढे.”-

तसे कालचक्र हे अविरत फिरतच राहते. शिशिर म्हणजे पानगळीचा काळ. तो गेल्यावर येतो तो वर्षभरातला सर्वात प्रसन्न, आल्हाददायक, रोमांचक काळ! वर्ष संपताना दिलासा हाच असतो की, आता येणारा ऋतू वसंत असणार आहे. सर्व भोवतालच्या नूतनीकरणाचा, नवनिर्मितीचा सृजनशील काळ. वसंत ऋतूवर सर्व भाषांतील साहित्यात, मराठी नाटकात, सिनेमात, अनेक सुंदर वर्णने आली आहेत. अगणित गाणी लिहिली गेली आहेत.

गोविंद घाणेकरांनी गदिमांच्या कथेवर काढलेला आणि मधुकर पाठक यांनी दिग्दर्शित केलेला ‘प्रपंच’ नावाचा सिनेमा आला होता तब्बल ६४ वर्षांपूर्वी. तो होता एक बोधपट. त्याने तब्बल ७ पुरस्कार पटकावले.

मधुकर पाठकांना सर्वोत्तम दिग्दर्शकाचे राज्य सरकारचे पारितोषिक, त्यांनाच गुणवत्तेचे तिसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक, ‘इंडियन नॅशनल पिक्चर्स’ला महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्तम सिनेमाचे पारितोषिक, सुलोचना लाटकर यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्तम अभिनेत्रीचे पारितोषिक, कुसुम देशपांडे यांना राज्य सरकारचे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे, सुधीर फडके यांना सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचे आणि गदिमांना सर्वोत्तम गीतलेखनाचे पारितोषिक सरकारने दिले. गदिमांनी या चित्रपटासाठी लिहिलेल्या गाण्यात दोन अविस्मरणीय गाणी होती. स्वत: सुधीर फडकेंनी गायलेली.

“पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी.”

दुसरे गाणे होते आता येऊ घातलेल्या वसंत ऋतूचा उल्लेख असलेले, आशाताईंच्या ताज्यातवान्या आवाजातील भावमधुर मुग्ध गीत. शब्द होते -

‘आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही.’

चित्रपटाची नायिका नलिनी सराफ ऊर्फ सीमा देव हिच्या तोंडी हे मनप्रसन्न करणारे गाणे होते. एका कुंभकाराची मुलगी असलेली चंपा (सीमा) घरात आपल्या लग्नाचा विषय निघाल्याने हरखून गेली आहे. प्रियकराशी विवाह होण्याच्या शक्यतेने ती अगदी मोहरून गेली आहे. आपण यौवनात पदार्पण केले हे घरच्याच्या लक्षात आले आहे, लवकरच आपल्या जीवलगाशी मीलन शक्य होणार म्हणून ती खूप आनंदाली आहे.

आजूबाजूला फुलत असलेला वसंत ऋतू आपल्याही देहात उमलतो आहे असे तिला वाटते. शरीरात होत असलेल्या आगळ्या अनुभूतीची जाणीव तिला बेधुंद करते. आपल्यात होणारे बदल आपल्याच लक्षात कसे आले नाहीत?’ याचे तिला नवल वाटते आहे -

तारुण्याच्या सुरुवातीला माणसाला वेगळ्याच जाणिवा घेरून टाकतात. मुलांपेक्षा मुलींच्या शरीरात, मन:स्थितीत होणारे बदल त्यांना हळवे, तरल, अस्थिर करतात. कसलीच भीती वाटत नसताना नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येतात. शरीरात नव्यानेच उमलत जाणाऱ्या जाणिवांनी मन सैरभैर होते. त्याचे किती चित्रमय वर्णन गदिमा करतात, पाहा -

‘भीतीविना कशाचा देहावरी शहारा, हे ऊन भूषवीते सोन्यापरी शरीरा, का गुंफिली जरीने आभाळीची निळाई.’

घटकेत हसू येते, घटकेत लाजल्यासारखे होते, सतत मनात एक अबोध ओढ जाणवत राहते. कधी निसर्गात आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे पूर्ण भानच जाते, तर कधी अगदी छोट्याछोट्या गोष्टीही अधिक स्पष्टपणे जाणवू लागतात -

‘ओठांत थांबते का हासू उगाच माझे, बाहेर डोकविता का बोल आज लाजे. तो पोर कोकिळेचा रानात गीत गाई.’

सीमा या चित्रपटात नायिका चंपा म्हणून एका साध्याभोळ्या मुलीच्या भूमिकेत आहे. तिने चंपाचा अभिनय खूप समरस होऊन केला आहे. यौवनसुलभ जाणिवा तिच्या मनाला सैरभैरही करून टाकतात. एकीकडे मनात आनंदाच्या लहरीही उठत आहेत आणि दुसरीकडे गोंधळल्यासारखेही होते आहे. मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिचे सगळे आकलनच बदलते. एक वेगळेच विश्व तिला जाणवू लागते. गदिमा ते मोठ्या कल्पकतेने सांगतात -

‘हे आज काय झाले, माझे मला कळेना, या नेणत्या जीवाला हे गूज आकळेना, ये गंध मोगऱ्याचा, आली फुलून जाई.’

प्रियकराशी जवळीकीचा ओढ चंपाच्या मनात वादळ पेटवते आहे. एक प्रेमभावना फुलते आहे. गदिमांनी जे या गाण्यात मांडले, काहीसा त्यांच्यासारखाच एक विचार आनंद बक्षीजींनी ‘सिंदूर’(१९८७)साठी लिहिलेल्या एका बेधुंद गाण्यात मांडला होता. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी लतादीदी आणि मोहम्मद अजीज यांच्याकडून गाऊन घेतलेल्या त्या गाण्याचे शब्द होते -

‘पतझड़ सावन बसंत बहार, एक बरसके मौसम चार, मौसम चार. पाँचवा मौसम प्यारका, इंतजारका...’

मात्र जाता जाता बक्षीसाहेबांनी शेवटच्या ओळीतून आजच्या स्व‍च्छंदी जगासाठी दिलेला एक संदेश खूप महत्त्वाचा होता. प्रेमाच्या अपूर्वाईचे महत्त्व तेव्हाच आहे जेव्हा ते शाश्वत असते. फुलपाखरू वृत्तीचे प्रेम हे प्रेम नसतेच. नात्यांच्या शाश्वततेला अधोरेखित करणारे बक्षीसाहेबांचे शब्द होते -

‘हर एक मौसम आये जाये, लेकिन प्यारका मौसम आये, सारे जीवनमें एक बार! पतझड सावन वसंत बहार....’

जेव्हा वेळ निघून चालल्याची जाणीव अनामिक हुरहूर लावते तेव्हा आशावादी सूर असणारी अशी गाणी फार मोठा दिलासा देऊ शकतात. म्हणून युट्यूबने दिलेल्या ‘टाइम मशीन’मध्ये बसून मागे जायचे आणि अशा आनंदाचा पुन:प्रत्यय घ्यायचा.

Comments
Add Comment