नगराध्यक्षपदी कुलदीपक शेंडे; राष्ट्रवादी बॅकफूटवर
खोपोली निवडणूक चित्र
सुभाष म्हात्रे खोपोली : खोपोली नगर परिषदेच्या चुरशीची निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने बाजी मारीत थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासह १४ जागांवर शिवसेनेने विजय संपादन केले असून, महायुतीमधील भाजपनेही चार जागा जिंकल्याने खोपोली नगर परिषदेवर महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी पुन्हा बॅकफूटवर गेली असून, दोन आकडी संख्यासुद्धा गाठता आली नाही. त्यामुळे या निकालावरून राष्ट्रवादीला आत्मपरिक्षणाची गरज भासणार आहे.
खोपोली नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परंपरागत असणारी सत्ता अखेर शिवसेनेने खेचून आणल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे. शिंदे गट शिवसेनेचे कुलदीपक शेंडे यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीचे सुनील पाटील यांचा १,११८ मतांनी पराभव केला.
श्रीमंत असलेली खोपोली नगर परिषद जिंकण्यासाठी महायुतीमध्ये असणाऱ्या शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात रस्सीखेच सुरू होती. महायुतीची बिघाडी होऊन शिंदे गट आणि भाजप आरपीआय यांनी महायुती केली होती, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने शिवसेनेबरोबर परिवर्तन विकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे गेले होते.
२ डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचा निकाल २१ डिसेंबरला जाहीर झालेल्या निकालात शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी १ हजार ११८ मतांची आघाडी घेत विजय संपादन केले. यात कुलदीपक शेंडे यांना २०,४६९ मते मिळाली, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील पाटील यांनी १९,३५२ मते मिळवित त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला, तर खोपोली नगरपालिकेच्या १५ प्रभागांत शिवसेना शिंदे गटाला १४, अजित पवार गट राष्ट्रवादीला ७, तसेच भाजपला ४ व शेकापला ४, तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटानेही आपले खाते खोलत प्रभाग तीनमधून सुवर्णा मोरे यांनी विजय संपादन केला.
खोपोली प्रभाग सहामधून अपक्ष उमेदवार राहुल गायकवाड यांनी विजय मिळविला आहे. एकूणच या निवडणुकीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठी चपराक बसली आहे. त्यामुळे अजित पवार गट राष्ट्रवादीवर या निवडणुकीबाबत आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.
उबाठाला एकही जागा नाही
दरम्यान, खोपोली नगरपरिषदेत मागिल निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता होती. यावेळी ही सत्ता खालसा झाल्याचे दिसून आले. खोपोलीत यावेळी वेगळीच राजकीय समिकरणे बघायला मिळाली. अजित पवार गट राष्ट्रवादी, शेकाप, उबाठा यांची युती झाली होती. दुसरीकडे आरपीआय, शिंदेगट शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. येथील ३१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आरपीआय, शिंदेगट शिवसेना आणी भाजप यांनी बाजी मारली आहे. या युतीचाच नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे निवडून आले, तर या युतीमधील शिंदे गटाला १४, भाजपाच्या वाट्याला ४ जागा आल्या. तर राष्ट्रवादी, शेकाप, उबाठा गटातील राष्ट्रवादीला सात, शेकापच्या वाट्याला ४, तर उबाठाला एकही जागा मिळाली नाही. शरद पवार गट आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली.