शिल्परत्न पद्मभूषण राम सुतार

डॉ. गजानन शेपाळ


‘सतत काम करत राहिलं तर कुठल्याही आजाराशिवाय १०० वर्षे माणूस जगू शकतो’ हे त्यांचं वाक्य त्यांनी शब्दशः सत्य करून दाखवलं. शंभरी पार केलेल्या राम सुतार यांनी सुमारे २००च्या वर सुप्रसिद्ध ठरतील अशी शिल्पे घडवली. ज्यात व्यक्ती, समूह आणि म्युरल्स यांचाही सहभाग आहे. त्यांच्यासोबतची डाॅ. गजानन शेपाळ यांची आठवण


ल्परत्न पद्मभूषण राम सुतार यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. धुळे जिल्ह्यातील ‘गोंदूर’ या गावातील, एका बलुतेदार कुटुंबातील मुलगा १०० वर्षांपूर्वी जन्म घेऊन शंभर वर्षांनंतर साऱ्या विश्वाने दखल घ्यावी इतके दिहीमान कला-कार्य करून देशाच्या राजधानीत विसावला... ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचं जड देहातील कार्य थांबलं. फार वेदना झाल्या.
संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला झाला होता त्या वर्षीची आठवण.


लोकसभेचे सभापती प्रिं. मनोहर जोशी सर होते आणि नेमक्या दोनच महिन्यांनंतर संसदेच्या प्रांगणात, मुख्य प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. तो पुतळा, बनवणारे हात महाराष्ट्राच्या खांदेशातील ‘गोंदूर’च्या ‘रामा’चे…!! त्याच काळात ‘अयोध्या’ खटल्याची खूप चर्चा सुरू होती आणि माझ्या एका लेखात मी, लिहिलं की “आता संसदेवर अतिरेक्यांचा हल्ला होणार नाही. कारण महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा संसदेच्या प्रवेशद्वारावर आहे. ज्यांनी तो साकारला तो महाराष्ट्राच्याच खांदेशाचा सुपुत्र आहे आणि ज्याच्या नावात ‘राम’ आहे. त्यामुळे आता अयोध्येतील ‘राम’ ही लवकरच अयोध्येत येणार...!!” हे वाक्य सरांना एवढं भावलं की, त्यांनी तसेच जोशी सरांनीही खास संपर्क करून दाद दिली होती.


“काम करणाऱ्याला मरण कसलं?” असं ताजमध्ये शिल्पकार राम सुतार यांनी त्यांची मी मुलाखत घेतली तेव्हा सांगितलं होतं. ते तसंच आयुष्य जगले. त्यांचा ध्यास त्यांचा विचार होता, त्यांचा विचार त्यांचं चिंतन होतं, त्यांचं चिंतन त्यांचं मनन होतं आणि त्यांचं मनन हे त्यांच्या प्रज्ञेचं मूर्त स्वरूप होतं. “सतत काम करत राहिलं तर कुठल्याही आजाराशिवाय १०० वर्षे माणूस जगू शकतो’ हे त्यांचं वाक्य त्यांनी शब्दशः सत्य करून दाखवलं.


वयाच्या दहाव्या वर्षी श्रीगणेशाची, मातीची मूर्ती, शाळेतल्या शिक्षकांना करून दाखवली, तेव्हा मिळालेली शाब्बासकीची पाठीवरची थाप, शिल्पकार राम सुतार यांना तब्बल ९ दशकं पुरून उरली. त्यांच्या वास्तववादी विचारसरणीत त्यांनी वास्तववादी किंवा मूर्त शैलीतील मूर्ती व शिल्ये साकारलेली दिसतात. मग त्या शिल्पाकृतींच्या “प्रपोर्शनेट” शरीरकारासोबतच चेहऱ्यावरील भाव टिपण्यातील त्यांचं कसब हे अवर्णनीय तर आहेच; परंतु शिल्पातील बोलकेपणा देखील तितकाच वाखाणण्यासारखा असायचा. त्यांना ‘मूर्त’- ‘अमूर्त’ या शैली प्रकारांबद्दल नेहमी जी मतं-मतांतरे होतात त्याचं वाईट वाटायचं.” तरुण, अननुभवी चित्रकार व शिल्पकार यांच्या “अमूर्त” शैलीतील कामावर ते नाराज असायचे. खंत वाटायची त्यांना.


वास्तववादी मूर्त किंवा “रिअॅलिस्टिक “शैलीचा अभ्यास सरावाने पूर्ण केल्यानंतच “अॅब्स्ट्रॅक्शन”कडे अर्थात अमूर्त शैलीकडे कलावंत आपोआप वळतो. असं ते नेहमी सांगायचे. भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची, संतपुरुषांची आणि संत-विभुतींची शिल्ये त्यांनी साकारलीत. पैकी अगदी अलीकडील जगातील सर्वात उंच, ‘स्टॅच्यु ऑफ युनिटी’ हा “सरदार वल्लभभाई पटेल” यांचा पुतळा साऱ्या जगभरात चर्चिला जातो आहे. “महात्मा इन मेडिटेशन (ध्यानस्थ महात्मा) हे संसदेच्या आवारातील म. गांधीजींचे शिल्प राजमान्य आणि जगन्मान्य झाले. मध्य प्रदेशातील चंबळ नदीवरील गांधीसागरमध्ये ४५ फूट उंचीचे भव्य शिल्प पाहून तत्कालिन पंतप्रधान पं. नेहरूंनी त्यांना पंजाबातील भाका-नांगल येथील ५० फुटी श्रमिकांचे शिल्प साकारण्यास सांगितले, जे काम त्यांनी खूप आत्मियतेने केले. त्यांच्या मूर्त शैली व तंत्र कौशल्यामुळे भारत सरकारने त्यांची भारतीय नेत्यांची शिल्ये उभारण्यासाठीचा अधिकृत शिल्पकार म्हणून नेमणूकच केली.


राजकारण्यांची जशी दिल्लीत लॉबी असते, तशीच प्रारंभी दिल्लीतील प्रस्थापित कला वर्तुळाकडून राम सुतार यांना मोठा त्रास झाला. संघर्षाचा कडेलोट झाला; परंतु मुळात महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले रामजी त्यांनी त्यांच्या रामबाणाने दिल्लीतील लॉबीवाल्यांना घायाळ केले. अत्यंत शांत, मीतभाषी, सोज्वळ तरीही हाताच्या कौशल्यांसाठी आणि सूक्ष्म अभ्यासात्मक निरीक्षणासाठी कठोर तसेच कर्मठ असणाऱ्या राम सुतारांनी दिल्लीच्या दृश्यकला राज्याचा
ताबा मिळवला.


देहभान विसरून काम कसं केलं जातं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे शिल्पकार राम सुतार होय. एकदा तर ते घरी दोन दिवस आलेच नाहीत म्हणून कुटुंबीयांनी काळजीपोटी पोलिसांची मदत घेऊन त्यांना शोधले. तेव्हा ते त्यांच्या स्टुडिओत एका शिल्पसृजनाच्या चित्तात मग्न झालेले होते. तादात्म्य पावणं म्हणजे काय? त्याचे हे उदाहरण होय. पुतळ्याच्या भव्यतेमुळे शिडीवरून काम करीत असताना थोडासा तोल गेला आणि ते पडले. हात मोडला. हाताला प्लास्टर लावल्यावर त्यांनी उर्वरित काम केले होते.
अनेक राष्ट्रीय पुरुष, नेते, धार्मिक व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे यांची कामे करताना ‘राम’जींनी, पुतळ्यांमध्ये ‘राम’ आणला, शिल्पकार राम सुतार यांनी त्यांच्या कामाचा, त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवांचा कधी अहंकार बाळगला नाही. एकदा अगदी वैयक्तिक स्तरावर ते म्हणाले होते, मला एक गोष्ट गेली अनेक वर्षे नेहमी खटकते, ती म्हणजे एखादी कलाकृती, मग ती पेंटिंग ‘स्वरूपात असो की “शिल्पाकृती वा मूर्ती” स्वरूपात असो. त्या कलाकृतीच्या अनावरणाला नेते, पुढारी जेव्हा येत असतात तेव्हा कुठेतरी मागे, लांब, दूर (जर ध्यानात राहिलं असेल तर) त्या कलाकाराला जागा दिलेली असते. एखादे नारळ वा पुष्पगुच्छ देऊन त्याची बोळवण केली जाते”, त्यांनी ही व्यक्त केलेली खंत तितकीच संवेदनशील आहे. हे सत्यच असतं की कलाकृतीचा जेव्हा सन्मान, बोलबाला होतो, प्रसिद्धी मिळते तितका सन्मान त्या कलाकृती निर्मात्याला मिळतो का? हा अनुत्तरीत राहणारा प्रश्न आहे. कलाकृती ही केव्हाही चिरंतन असते. श्रेयवादाच्या भोवऱ्यात ती अडकत नसते. म्हणूनच शिल्पकार राम सुतार यांना “महाराष्ट्रभूषण” या सर्वोच्च पुरस्काराने महाराष्ट्र सरकारने सन्मानित केले. त्यांना ‘टागोर’ पुरस्कारही मिळाला आहे.


१९ फेब्रुवारी १९२५ रोजी गोंदूर, जि. धुळे येथे जन्म झालेल्या या महाराष्ट्रभूषणास दि. १८ डिसेंबर २०२५ देवाज्ञा झाली. शंभर वर्षे पार केलेल्या राम सुतार यांनी सुमारे २००च्या वर सुप्रसिद्ध ठरतील अशी शिल्पे घडवली, ज्यात व्यक्ती, समूह आणि म्युरल्स यांचाही सहभाग आहे.


त्यांच्या कलाकृतीच्या रूपाने ते या पुढीलही शेकडो वर्षे स्मरणात राहतील. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी खंत व्यक्त केली जसे की, ज्या कलाकाराच्या कलाकृतींचे सार्वजनिक ठिकाणी सत्ताधारी मंडळींच्या हस्ते अनावरण होत असते. त्या त्या कलाकाराला, सदर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सन्मानाने वागणूक द्यावी तसेच कलाकारांच्या मानधनाच्या रकमांना विलंब लागू नये अशी धोरणात्मक योजना संबंधितांनी आखलेली असावी. हे जरी आपण आणि आपल्या संबंधित केंद्र सरकारांनी अमलात आणले तरी खऱ्या अर्थानेे शिल्पकार राम सुतार यांना श्रद्धांजली वाहिली असे म्हणता येईल.

Comments
Add Comment

मद्र नरेश ‘शल्य’

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे शल्य हा महाभारत युद्धातील प्रभावी योद्ध्यांपैकी एक होता. शल्य हा मद्र

जागतिक वारसास्थळ, सिंधुदुर्ग किल्ला

विशेष : लता गुठे छत्रपती शिवरायांच्या शौर्याने आणि पराक्रमाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. या भूमीवरच उभी

आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही...

डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे एक हुरहूर लावणारा काळ असतो. वर्ष संपत आलेले, वर्षाच्या सुरुवातीला केलेले अनेक

टायगर सफारी : पेंचच्या मोगली लँडमध्ये ६ तास

सफर : प्राची शिरकर “टायगर सफारी... हे नाव जरी काढलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात! वाघ पाहण्याची ओढ कोणाला नसते?

भारतीय चित्रपट निर्माते - दादासाहेब तोरणे

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर मचंद्र गोपाळ तोरणे तथा दादासाहेब तोरणे’ हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना

मना घडवी संस्कार

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे “मना सज्जना” मन सज्जन आहे. पण या मनात अविचारी, विकारी, चंचल-अतिचंचल मनाचे विचारच मनाला