प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ
एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक शिष्या हातामध्ये सुंदर फूल धरून उभी होती. ते पाहून एका साधूने आपल्या त्या शिष्याला विचारले की कसं वाटतंय? ती म्हणाली छान वाटतंय. छान म्हणजे? साधूने प्रतिप्रश्न केला तेव्हा ती उत्तरली की, हे फूल लाल रंगाचे आहे, त्यावर पांढऱ्या रंगाचे ठिपके आहेत, त्यामुळे डोळ्याला पाहायला ते खूप छान वाटत आहे. त्याचा स्पर्श रेशमी आहे आणि त्याचा वास मनाला मोहून टाकणारा आहे. साधू हसला. त्या शिष्येने विचारले की, आपण का हसलात? फूल हातात धरल्यावर तुम्हाला ही अनुभूती येत नाही का? साधू नम्रपणे म्हणाला की हो, मलाही हीच अनुभूती येते; परंतु किती काळ ही अनुभूती येऊ शकते? एक दिवस, दोन दिवस, पाच दिवस? शिष्या विचार करू लागली आणि तिने उत्तर दिले की एका दिवसानंतर फूल कोमेजणार. पण कदाचित सुगंध आणखी एक दिवस येऊ शकेल! जसं फूल वाळेल तसा त्याचा रेशमी स्पर्शसुद्धा खरखरीत होईल. साधू शांतपणे ऐकत होता. मग त्यांनी एक प्रश्न त्या शिष्येला विचारला की, आता ज्या स्थितीत तुझे हात आहेत त्याच स्थितीत तू किती काळ राहू शकशील? ती म्हणाली की काही तासातच हात बधिर होऊ शकतो. कदाचित निकामी होऊ शकतो. पण महाराज आपण का विचारत आहात? तेव्हा तो साधू उत्तरला की एक सुंदर, आकर्षक, कोमल, सुगंधी फूल काही काळ हातात धरल्याने जर माणसाची शारीरिक अवस्था बिघडू शकते तर मग आपण आपल्या मनात किती गोष्टी साठवून ठेवतो, त्यामुळे आपली मानसिक अवस्था किती बिघडू शकते? साधूच्या या उत्तराचा मथितार्थ शिष्येच्या लक्षात आला. ती खूप दिवस आपल्या सखीशी अबोला धरून होती. तिने फूल साधूच्या पायापाशी ठेवले आणि ती तिकडे जंगलाच्या वाटेकडे निघून गेली. थोड्या वेळात तिची प्रिय सखी आणि ती एकमेकांचे हात धरून साधूकडे आल्या. दोघीही सोबतीने साधूच्या पाया पडल्या. साधूने मायेने दोघींच्या डोक्यावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला!
आता या छोट्याशा कथेतून आपण नेमकेपणे काय घ्यायचे? किती वर्षात आपण आपले मन स्वच्छ केले का? किती जणांविषयी राग, द्वेष, मत्सर बाळगून आपण जगत राहिलो. किती प्रकारच्या चिंताचे ओझे मनावर लादत राहिलो. आपण कधी त्यापासून आपल्या मनाची सुटका केली का? फक्त विचार करा.
छोटीशी सुरुवात करूया. आपल्या आयुष्यात आलेल्या नातलगांपैकी किंवा मित्र-मैत्रिणींपैकी जो व्यक्ती आपल्या जवळचा होता आणि आता दुरावलेला आहे, त्याला एक फोन करून पाहूया का? त्यांनी उचललाच तर फक्त एक शब्द ‘सॉरी’ उच्चारून बघा. आपली माणसे आपलीच असतात. आपली वाट पाहत असतात. आता गहन प्रश्न हा आहे की आपल्यात जो दुरावा निर्माण झाला त्याचे कारण त्याची चूक होती की, आपली चूक होती हे विसरून आपण ‘सॉरी’ म्हणायचे!
थबकलात, विचार करू लागलात? आणखी एक चिंता? खरंतर आणखी एक गोष्ट आठवली. मी कधीच मृत माणसाला खांदा दिलेला नाही; परंतु कित्येक खांदेकऱ्यांनी मला एक गोष्ट सांगितली आहे ती ही की मृत माणसाची बॉडी प्रचंड जड होते. बाकी सायन्स वगैरे बाजूला ठेवून मी या क्षणी विचार करत आहे की माणूस वजन काट्यावर उभा राहतो तेव्हा शरीराचे वजन तो काटा दाखवतो पण मेल्यावर कदाचित मनावरचे वजनसुद्धा खांदेकऱ्यांना पेलावे लागत असावे!
शेवटी काय तर ज्याप्रमाणे आपण आपले शरीर रोज बाहेरून स्वच्छ करतो. उपासतापास करून आतून स्वच्छ करतो त्याप्रमाणे या वर्षाच्या शेवटी आपले मनसुद्धा थोडेसे स्वच्छ करूया आणि मी सुचवल्याप्रमाणे एक फोन करून बघूया. नवीन नात्यासहीत आनंदाने नवीन येणाऱ्या वर्षाच्या स्वागतास तयार राहूया!
pratibha.saraph@ gmail.com






