नवी दिल्ली : नितीन नवीन यांना भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्याची घोषणा २० जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. नवीन यांचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकाळ जानेवारी २०२६ ते जानेवारी २०२९ पर्यंत राहील. २०२९ मध्ये लोकसभा निवडणुका प्रस्तावित असल्याने त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो.
भाजप देशभरातील प्रदेशाध्यक्षांना १५ जानेवारीनंतर दिल्लीला बोलावण्याची तयारी करत आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडणुकीची प्रक्रिया १८ ते २० जानेवारी दरम्यान पूर्ण होण्याची शक्यता आहे. पक्षाने शासित राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये पूर्ण झाली आहे. ३७ पैकी २९ राज्यांमध्ये अंतर्गत निवडणुकांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. या राज्यांचे भाजप प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी नितीन नवीन यांच्या समर्थनार्थ उमेदवारी अर्जांचा एक संच सादर करतील. नवीन यांच्या समर्थनार्थ दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांवर पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याही स्वाक्षऱ्या असतील.
नितीन नवीन हे एकमेव उमेदवार म्हणून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने, भाजपचे मुख्य निवडणूक अधिकारी के. लक्ष्मण उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीची औपचारिक घोषणा करू शकतात. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नवीन यांना १४ डिसेंबर रोजी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.






