मुंबई (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक व अध्यक्षा नीता अंबानी यांनी कर्करोग रुग्णांसाठी रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या ‘जीवन’ या नव्या शाखेचे उद्घाटन केले. हे रुग्णालय त्यांनी आपल्या दिवंगत वडील रवींद्रभाई दलाल यांच्या स्मरणार्थ समर्पित केले. उद्घाटनप्रसंगी मुकेश अंबानी उपस्थित होते. यावेळी पूर्णिमा दलाल, ममता दलाल तसेच अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतला. रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी नीता अंबानी यांनी म्हटले की, ‘जीवन’ हे माझ्या वडिलांना अर्पण केलेले एक श्रद्धास्थान आहे. त्यांनी मला नेहमी सेवा आणि करुणेचे महत्त्व शिकवले. समाजाची निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती असल्याचा संस्कार त्यांनी माझ्यावर केला. मुंबईतील रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या १०व्या वर्धापन दिनानिमित्त नव्या शाखेची पायाभरणी करण्यात आली. रुग्णालयाच्या नव्या विभागात केमोथेरपीसह अत्याधुनिक कर्करोग उपचार सुविधा तसेच डायलिसिस सेवाही येथे दिली जाणार असून मुलांसाठी स्वतंत्र केमोथेरपी वॉर्ड आहे.