Sunday, December 28, 2025

नववर्षाच्या पार्टीला लगाम, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५२ जणांवर गुन्हा दाखल

नववर्षाच्या पार्टीला लगाम, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ५२ जणांवर गुन्हा दाखल

पुणे : विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी सुरू असलेल्या बेकायदा पार्ट्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विमाननगर परिसरातील ‘द नॉयर’ (‘रेड जंगल’) या नामांकित पबमध्ये कोणताही वैध परवाना नसताना सुरू असलेल्या न्यू इयर पार्टीवर शनिवारी पहाटे छापा टाकण्यात आला. या कारवाईत महिला व पुरुष मिळून एकूण ५२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून पब मालक अमरजित सिंग संयु यांच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर पार्टीचे आयोजन होत असल्याने बेकायदा कार्यक्रमांवर लक्ष ठेवण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत होती. याच दरम्यान विमाननगर परिसरात कोणताही परवाना न घेता ‘द नॉयर’ पबमध्ये पहाटेपर्यंत पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कांदे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ छापा टाकला.

कारवाईदरम्यान पबमध्ये नियमांचे उल्लंघन करून दारू विक्री आणि पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून विदेशी दारूच्या तब्बल १७८ बाटल्या जप्त करण्यात आल्या. यासह सुमारे ३ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणात पबमधील ग्राहक, कर्मचारी तसेच व्यवस्थापनाशी संबंधित व्यक्तींवर संबंधित कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील एकूण ५२ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पब चालक आणि व्यवस्थापक अशा दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी त्यांना फरार घोषित केले असून त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके नेमण्यात आली आहेत.

दरम्यान, नववर्षाच्या निमित्ताने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकूण २१ भरारी पथके तैनात करण्यात आली होती. बेकायदा दारूविक्री, परवान्याविना सुरू असलेल्या पार्ट्या आणि नियमबाह्य पब्सवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >