नक्षत्रांचे देणे : डॉ. विजया वाड
मी मराठी विश्वकोशाची प्रमुख संपादक होते तेव्हा वाई येथे महिन्यातून १० दिवस (३-३-४) असा तुटक मुक्काम मी करीत असे. कामाचे वाटप करून नि स्वतः मुख्यत्वे लेखन (विश्वकोश नोंदींचे) करीत असे. मुख्याध्यापक पद शाळेत वर्षानुवर्षे केल्याने हा अनुभव मला काही नवा नव्हता.
विश्वकोशात काम करताना जवळच एक इमारत होती. तेथून खिडकीतून मला कामाची खोली (तिची खिडकी) दिसत असे. चार देंगेवर असलेले हे विश्रामगृह मला फार आवडे. नि त्याची विश्रामगृहाची एक खोली माझी फार लाडकी होती. एक दिवस मी विश्रामगृहात विसावा करताना घेत असताना एक साधेसे गृहस्थ सरळ आत आले.
मला रागच आला. खालील संवाद घडला.
“अहो, कोण तुम्ही?”
“मी मराठी विश्वकोश अध्यक्ष आहे.”
“ही माझी खोली आहे.”
“माझी म्हणजे कोणाची?”
“माझी म्हणजे माझी”
“अहो पण तुम्ही कोण आहात?”
“मी कोण? ते सांगणे मला महत्त्वाचे वाटत नाही.”
“पण मला महत्त्वाचे वाटते ना!” मी हट्ट केला. तर ते गृहस्थ रागेरागे बाहेर निघून गेले.
थोड्याशाने ते गृहस्थ कोण आहेत ते गृहस्थांकडून कळले.
“आपण हे बरे केले नाही.”
“काय बरे केले नाही.”
तो गाणे गाऊ लागला. म्हणू लागला “असुनि खास मालक घरचा .....
“अरे तू हे गाणे वारंवार का म्हणत आहेस?”
“मग दुसरे तिसरे काय करू?”
“दुसरी कुठली गाणी येत नाहीत का तुला?”
“मला आता दुसरे कुठले गाणे सुचतच नाही.”
“का बरे?”
“परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला.”
“पुन्हा तेच गाणे?”
“तेच गाणे ओठावर येते हो बाई.”
“अहो, कोण आले होते खोलीत ! ठाऊक आहे का आपणास ?”
“कोण आले होते?”
“कोल्हापूरचे महाराज आले होते.”
“काय सांगतोस? अरे, ते सरळ खोलीत घुसले.”
“ही त्यांचीच खोली आहे.”
“म्हणजे?”
“ही सारी प्रॉपर्टी महाराजांचीच आहे.”
“अरे, पण मला कसे कळणार रे?”
“काय?” “की ते महाराज आहेत म्हणून?” “महाराज खूप साधे राहतात.”
“हो. ते समजलं त्यांच्या पेहेरावावरून.” “मग बरं!”
“मी त्यांना सांगते.”
“काय सांगता?”
“अरे, क्षमा मागते त्यांची.”
“काय म्हणाल?”
“सांगते की, महाराज, मी आपल्याला ओळखले नाही. साधे कपडे घातलेले असल्याने ओळखले नाही.”
“हां. ते बरं होईल” तो असे म्हणाला नि निघून गेला.
“महाराज कुठे भेटतील?”
“ते बाहेर रुसून बसले आहेत. तो म्हणाला.
मी बाहेर गेले. “क्षमा करा महाराज. मी आपल्याला ओळखले नाही.”
“अहो, बाईसाहेब, उत्तरीय मुकुट घालण्याचे दिवस गेले आता. भारतात लोकशाही खोलवर रुजली आहे.”
“हो, तेही खरंच म्हणा.”
“मला अगदी ‘एसी’ खोली आहे. पण या खोलीची ऊबच न्यारी आहे.”
मग मी झोपू का आपल्या एसी खोलीत?”
“अवश्य.” आणि मी महाराजांच्या एसी खोलीत झोपले नि ते माझ्या उबदार खोलीत! महाराजांचे साधेपणं माझ्या अंतरात खोलवर रुजले.