मद्र नरेश ‘शल्य’

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे


शल्य हा महाभारत युद्धातील प्रभावी योद्ध्यांपैकी एक होता. शल्य हा मद्र देशाचा राजा व नकुल सहदेवांची माता माद्रीचा भाऊ होता, म्हणून तो पांडवांचा मामा होता.


महायुद्धाची निश्चिती झाल्यानंतर अनेक राजे महाराजे या युद्धात सहभागी होण्यासाठी निघत होते. त्यानुसार शल्यही आपल्या राज्यातून मोठे सैन्य घेऊन पांडवाकडे जाण्यास निघाला. पराक्रमी शल्य आपल्या बाजूने यावा अशी दुर्योधनाची इच्छा होती. त्यासाठी त्याने एक डाव रचला. त्याने आपले दूत पाठवून शल्ल्याच्या येण्याच्या मार्गात ठिकठिकाणी त्याचे भव्य स्वागत करविले. सर्व मार्गांत स्वागताची व भोजनाची उत्तम व्यवस्था व मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवले. मात्र हे स्वागत कोण करीत आहे हे शल्याला कळू न देण्याचा डाव रचला. शल्ल्याने आपल्या सोबत सैन्याची रसद आणली होती. मात्र वाटेत झालेल्या आदर सत्कारामुळे व उत्तम व्यवस्थेमुळे तो अतिशय भारावून गेला. हे सर्व पांडवांनीच केले असावे अशा कल्पनेने तो खूश झाला व हा सत्कार पांडवांनी केला असल्याची खात्री असल्याने त्याने ज्याने आदर सत्कार केला त्याला माझ्यासमोर आणा अशी सेवेकऱ्यांना विनंती केली. सेवेकरी सैनिकांनी तत्काळ दुर्योधनाला शल्यासमोर आणले. दुर्योधनाने शल्याला नम्रपणे प्रणाम केला. दुर्योधनाने केलेल्या आदर सत्कारामुळे त्याचा ऋणी झालेल्या शल्याने दुर्योधनाला एखादी इच्छा पूर्ण करावयाची असल्यास व्यक्त होण्याची सूचना केली. दुर्योधनाने आपण कौरव-पांडव दोघांचेही मामा आहात तेव्हा तुम्ही आमच्या बाजूने युद्धात भाग घ्यावा अशी विनंती केली. दुर्योधनाच्या आदर सत्काराने ऋणी झालेल्या शल्ल्याने नाईलाजाने दुर्योधनाची विनंती मान्य केली. मात्र आपल्या सख्ख्या भाच्यांविरुद्ध लढावे लागणार या जाणीवेने त्याला गलबलून आले. तो अस्वस्थ झाला. दुर्योधनाच्या कपट कारस्थानाचा त्याला अतिशय संताप आला, मात्र शब्दाला व अन्नाला जागण्याची त्याची रीत असल्याने त्यांने कौरवाकडून लढण्याचे नाईलाजाने मान्य केले; परंतु कौरवांकडून लढावे लागणार या जाणीवेने तो अस्वस्थ झाला. आपली ही अस्वस्थता भगवान श्रीकृष्णाजवळ भेटून व्यक्त केली. त्यावर कृष्ण व अर्जुनाने त्याला नाराज न होण्याचा सल्ला दिला व युधिष्ठिराने शल्ल्याला जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा कर्णासमोर अर्जुनाचा सामना होईल त्यावेळेला अर्जुनाची स्तुती करण्याचा सल्ला दिला.


शल्य घोड्यांना हाताळणे व काबुत ठेवण्याच्या कलेत श्रीकृष्णाच्या तोडीचा होता. महाभारतातील युद्धात भीष्म, द्रोण असे रथी, महारथी मरण पावल्यानंतर कर्णाला सैन्याचा सेनापती करण्यात आले. तेव्हा कर्णाने युद्धात आपल्या रथाचा सारथी कृष्णाच्या तुलनेत थोडा तरी योग्य असावा असे वाटले व यासाठी शल्य हा एकमेव योग्य व्यक्ती असल्याने कर्णाने दुर्योधनाला शल्ल्याला आपले सारथ्य करण्याची विनंती करण्याची सूचना केली. दुर्योधनाने त्याप्रमाणे शल्ल्याला कर्णाचा सारथी होण्याची विनंती केली. वास्तविक महाभारतात शल्ल्याचा उल्लेख अतिरथी होता त्यामुळे त्याला युद्ध करण्याची इच्छा होती. आता कर्णाचा सारथी होण्याची दुर्योधनाने विनंती केल्यावर त्याला अतिशय दुःख झाले, मात्र दुर्योधनाला एकदा शब्द दिल्यामुळे त्याने ही कामगिरी स्वीकारली. वास्तविक एका राजाला दुसऱ्या राजाचा सारथी होणे ही बाब मुळीच अभिमानास्पद नसते. ती त्याच्या प्रतिमेला धक्का देणारी व आत्मसन्मानाला ठेच पोहोचणारी असते. अनिच्छेने कराव्या लागणाऱ्या या कामामुळे तो कर्णाचा नेहमी व्यंगात्मकरीत्या उल्लेख करून अपमान करीत असल्याची उदाहरणे युद्धप्रसंगी महाभारतात आढळतात. आपल्या मनाची होणारी तगमग त्याच्या कर्णाशी झालेल्या संभाषणात व महाभारतात कर्ण-अर्जून युद्ध प्रसंगी नेहमीच जाणवते.


कर्णाच्या मृत्यूनंतर कौरवांच्या सेनापती पदाची जबाबदारी शल्ल्याकडे येते. युद्धात त्याने नकुल, अर्जुन, सहदेव, धृष्टद्युम्न, शिखंडी आदींशी सामना केल्याचा व भीमाने मात्र त्याला पराभूत केल्याचा उल्लेख महाभारत युद्धात आहे. शेवटी युधिष्ठिराशी झालेल्या युद्धात युधिष्ठिराच्या हातून शल्ल्याला मरण आले.

Comments
Add Comment

जागतिक वारसास्थळ, सिंधुदुर्ग किल्ला

विशेष : लता गुठे छत्रपती शिवरायांच्या शौर्याने आणि पराक्रमाने पावन झालेली महाराष्ट्र भूमी आहे. या भूमीवरच उभी

आला वसंत देही, मज ठाऊकेच नाही...

डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे एक हुरहूर लावणारा काळ असतो. वर्ष संपत आलेले, वर्षाच्या सुरुवातीला केलेले अनेक

टायगर सफारी : पेंचच्या मोगली लँडमध्ये ६ तास

सफर : प्राची शिरकर “टायगर सफारी... हे नाव जरी काढलं तरी अंगावर रोमांच उभे राहतात! वाघ पाहण्याची ओढ कोणाला नसते?

भारतीय चित्रपट निर्माते - दादासाहेब तोरणे

कोकण आयकॉन : सतीश पाटणकर मचंद्र गोपाळ तोरणे तथा दादासाहेब तोरणे’ हे मराठी, भारतीय चित्रपट निर्माते होते. त्यांना

शिल्परत्न पद्मभूषण राम सुतार

डॉ. गजानन शेपाळ ‘सतत काम करत राहिलं तर कुठल्याही आजाराशिवाय १०० वर्षे माणूस जगू शकतो’ हे त्यांचं वाक्य त्यांनी

मना घडवी संस्कार

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे “मना सज्जना” मन सज्जन आहे. पण या मनात अविचारी, विकारी, चंचल-अतिचंचल मनाचे विचारच मनाला