तिरुवनंतपुरम : श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग चौथा विजय झाला. या विजयामुळे भारताने मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने वीस षटकांत दोन बाद २२१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला वीस षटकांत सहा बाद १९१ धावा एवढीच मजला मारता आली. भारताने सामना ३० धावांनी जिंकला.
भारताच्या महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना आठ विकेट राखून तर दुसरा सामना सात विकेट राखून जिंकला. हे दोन्ही सामने विशाखापट्टमण येथे झाले. यानंतर पुढील दोन सामने तिरुवनंतपुरम येथे झाले. भारताने तिसरा सामना आठ विकेट राखून तर चौथा सामना ३० धावांनी जिंकला. आता शेवटचा सामना मंगळवार ३० डिसेंबर २०२५ रोजी तिरुवनंतपुरम येथे होणार आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताकडून स्मृती मानधनाने ४८ चेंडूत ८० धावा केल्या तर शफाली वर्माने ४६ चेंडूत ७९ धावा केल्या. रिषा घोषने १६ चेंडूत नाबाद ४० तर हरमनप्रीत कौरने दहा चेंडूत नाबाद १६ धावा केल्या. श्रीलंकेकडून मालशा शेहानीने स्मृतीला तर निमाशा मदुशानीने शफालीला बाद केले.
धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेकडून हसिनी परेराने ३३, चामरी अथापथ्थुने ५२, इमेशा दुलानीने २९ (धावचीत), हर्षिता समरविक्रमने २०, कविशा दिलहारीने १३, नीलक्षीका सिल्वाने नाबाद २३, रश्मिका सेववंडीने पाच आणि कौशानी नुथ्यांगनाने नाबाद पाच धावांचे योगदान दिले. भारताकडून वैष्णवी शर्मा आणि अरुंधती रेड्डीने प्रत्येकी दोन तर श्री चरणीने एक विकेट घेतली.






