भाषणाची भीती

कथा : रमेश तांबे 


एक होता राजा. त्याच्या राज्याचा एक नियम होता की जो कोणी चोर सापडेल त्याला भुकेलेल्या सिंहाच्या पिंजऱ्यात सोडायचं. मग तो भुकेने कासावीस झालेला सिंह काही मिनिटांतच त्या चोराचा फडशा पाडून टाकायचा. आणि विशेष म्हणजे लोकांनी या प्रसंगी उपस्थित राहिले पाहिजे असा राजाचा आदेश होता. जेणेकरून लोक गुन्हा करताना शंभर वेळा विचार करतील. त्यामुळे आपल्या राज्यातील गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल असा राजाचा विश्वास होता.


काही दिवसांतच एकदम दोन चोरांना कोतवालाने पकडून राजासमोर हजर केले. राजाने आदेश दिला पंधरा दिवसांनी मोकळ्या मैदानात या दोन चोरांना सिंहाच्या पिंजऱ्यात सोडण्यात येईल. हा प्रसंग पाहण्यासाठी लोकांना बोलावण्यात आले. एका भल्यामोठ्या मैदानाच्या मध्यभागी सिंहाचा पिंजरा ठेवण्यात आला. आज सिंह या चोरांचा कसा फडशा पाडणार हे पाहण्यासाठी लोकांनी अलोट गर्दी केली होती. राजादेखील आपल्या मंत्रिमंडळींसह मैदानावर हजर होता. सर्व जनता मोठ्या उत्साहात उभी होती. मग तो क्षण जवळ आला. दोन्ही चोरांना दोरखंडाने बांधून सिंहाच्या पिंजऱ्याजवळ नेण्यात आले. सर्व जनता श्वास रोखून बघू लागली.


सैनिकांनी गेले पंधरा दिवस उपाशी असलेल्या सिंहाचा पिंजरा उघडला अन् त्यांनी पहिल्या चोराला पिंजऱ्यात ढकलले. मग मोठे नवलच घडले. तो चोर न घाबरता स्वतःच सरळ सिंहाजवळ गेला अन् त्याच्या कानात त्याला काही तरी सांगितले. अन् काय आश्चर्य, त्या सिंहाने चोराला काहीच केले नाही. तो चोर सरळ पिंजऱ्याबाहेर पडला. हे दृश्य बघून जनतेने तर तोंडातच बोटे घातली. राजादेखील अगदी चक्रावून गेला. मग दुसऱ्या चोराला पिंजऱ्यात सोडण्यात आले. मग त्या चोरानेदेखील सिंहाच्या कानात काहीतरी सांगितले अन् तोही सरळ पिंजऱ्याच्या बाहेर आला. आता मात्र सर्व बघे अगदी गोंधळून गेले. हे कसे शक्य आहे. असा भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होता.


इकडे राजा आपल्या प्रधानाकडे, मंत्र्यांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. आता दोघेही चोर राजाच्या शेजारी उभे राहून गालातल्या गालात हसत होते. मग राजा धावतच पिंजऱ्याकडे गेला अन् सिंहाला म्हणाला, काय रे तू पंधरा दिवस उपाशी आहेस ना; मग त्यांना तू खाल्ले का नाहीस? आणि मला एक सांग त्या दोघांनी तुझ्या कानात काय सांगितले!


मग सिंह बोलू लागला, “महाराज मी गेले पंधरा दिवस उपाशी आहे हे खरं आहे. पण त्या दोघांनी माझ्या कानात सांगितले की, आम्हाला खाऊन झाले की राजा आणि त्याच्या मंत्रिमंडळातील नऊ मंत्री तुझ्यापुढे चार तास भाषणे करणार आहेत. महाराज क्षमा करा. मला भाषणे ऐकण्याचा फारच कंटाळा येतो. मग मी विचार केला की ही एवढी भाषणे ऐकण्यापेक्षा आपण उपाशी राहिलेलं बरं! आणि म्हणूनच मी त्यांना काही न करता पिंजऱ्यातून बाहेर जाऊ दिलं. सिंहाचे हे कथन ऐकून राजाने कपाळावरच हात मारला.

Comments
Add Comment

सरत्या वर्षाच्या उंबरठ्यावर...!

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ एक कथा कुठेतरी वाचल्याचे आठवत आहे, जी माझ्या पद्धतीने मी फुलवून सांगण्याचा

२०२५ वर्षात काय कमावले, काय गमावले

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर मानवी जीवनात प्रत्येक वर्ष हे अनुभवांचे दालन उघडते. २०२५ हे वर्षही तसेच

सूर्य पूर्वेकडेच का उगवतो?

कथा : प्रा. देवबा पाटील सीता व नीता या दोन्ही बहिणी खूपच चौकस होत्या. सुट्टीनिमित्ताने त्यांची प्राध्यापिका

आकाश रात्री काळे का दिसते?

कथा : प्रा. देवबा पाटील आज शाळा सुटल्यांनतर घरी येताबरोबर सीता व नीता या दोघीही बहिणींनी “मावशी” म्हणून आनंदाने

मानवतावादी कलाकार...

कथा : रमेश तांबे बालमित्रांनो, ही गोष्ट आहे युरोपमधल्या एका प्रसिद्ध गायकाची आणि त्याच्या वागण्याची! एका देशात

रिॲलिटी शो

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘रिॲलिटी शो’ म्हणजे शुद्ध मराठीत वास्तविकतेचे दर्शन. म्हणजेच सत्य परिस्थिती