२०२६ पासून ‘चेहरेपट्टीची ओळख’ बंधनकारक
नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा असलेल्या नीट व जेईई परीक्षांमध्ये गेल्या काही वर्षांत डमी उमेदवार, पेपरफुटी, ओळख लपवून परीक्षा देणे आदी गैरप्रकार वाढल्याचे चित्र समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आता अधिक कठोर उपाययोजना राबवत असून, २०२६ पासून परीक्षा प्रक्रियेत ‘चेहरेपट्टीची ओळख’ (फेशियल रेकग्निशन) तंत्रज्ञान बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या प्रणालीमुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढून फसवणुकीला कायमचा आळा बसेल, असे एनटीएकडून सांगण्यात आले.
नव्या व्यवस्थेनुसार, उमेदवारांना परीक्षा अर्ज भरताना थेट मोबाईल किंवा संगणकाच्या कॅमेऱ्याद्वारे लाइव्ह फोटो अपलोड करणे अनिवार्य राहणार आहे. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या राधाकृष्णन समितीच्या शिफारशींनुसार हा बदल अमलात आणला जात आहे.
यामुळे अर्ज करणारा विद्यार्थी आणि प्रत्यक्ष परीक्षेला बसणारा उमेदवार यांच्यातील ओळखीतील तफावत तत्काळ लक्षात येणार असून, बनावट उमेदवारांना रोखणे शक्य होणार आहे. नीट २०२५ परीक्षेदरम्यान दिल्लीतील काही निवडक परीक्षा केंद्रांवर ‘आधार-आधारित फेशियल रेकग्निशन’ प्रणालीची प्रायोगिक चाचणी घेण्यात आली होती. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरल्याने, २०२६ पासून देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांवर ही तंत्रप्रणाली लागू करण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
या तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उमेदवाराच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचे सखोल विश्लेषण करून ते सुरक्षित डेटाबेसमध्ये जतन करते. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचा थेट स्कॅनद्वारे चेहरा तपासण्यात येईल.
डेटाबेसशी ओळख जुळल्याशिवाय कोणालाही परीक्षागृहात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नीट व जेईईसारख्या महत्त्वाच्या परीक्षांतील विश्वासार्हता अधिक बळकट होणार असून, गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रियेला चालना मिळेल, असे सांगितले जात आहे.
काय अपेक्षित आहे
- डमी उमेदवारांना प्रवेश मिळणे अशक्य.
- फसवणूक आणि पेपरफुटी प्रकारावर मोठा अंकुश.
- उमेदवारांच्या सुरक्षिततेसह परीक्षा प्रक्रियेत वाढती पारदर्शकता.
- देशभर एकसमान परीक्षा सुरक्षायंत्रणा लागू.






