हैदराबाद : 'झुकेगा नही' म्हणणारा अभिनेता कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २'च्या प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झालेली, या घटनेमध्ये ८ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला, तर ३५ वर्षाच्या महिलेला आपले प्राण गमवावे लागले .या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली असून, यामुळे अल्लू अर्जुन या अभिनेत्याच्या आयुष्यात अडचणी वाढणार शक्यता आहे.
हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी चेंगराचेंगरी प्रकरणी १०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. या आरोपपत्रात पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनसह एकूण २३ जणांविरुद्ध आरोप ठेवले आहेत.
आरोपींच्या यादीत सुपरस्टार अल्लू अर्जुनचं नाव आरोपी क्रमांक ११ म्हणून नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे संध्या थिएटरचे व्यवस्थापन आहे. मात्र,केवळ व्यवस्थापनच नाही,तर अल्लू अर्जुनचे ३ मॅनेजर, ८ बाउन्सर आणि खासगी सुरक्षा रक्षकांवरही या दुर्घटनेसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर २०२४ रोजी 'पुष्पा २' प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी प्रचंड गर्दी झाली होती. अल्लू अर्जुन आला त्यावेळी नियोजनाच्या अभावामुळे आणि वाढत्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू झाला,तर तिचा ८ वर्षांचा मुलगा श्रीतेज गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर १३ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला. पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी त्याची ३ तास कसून चौकशी केली होती. त्यावेळी अल्लूने आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की,"घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो आणि मला या मृत्यूची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाली."
पीडित कुटुंबाला अल्लू अर्जुनच्या वडिलांकडून आर्थिक मदत
मानवतेच्या दृष्टिकोनातून 'पुष्पा २'च्या टीमने पीडित कुटुंबाला २ कोटी रुपये आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी १ कोटी रुपये, अशी एकूण ३ कोटींची मदत दिली होती.मात्र,आर्थिक मदत दिली असली तरी कायद्याच्या कचाट्यातून अभिनेता अद्याप सुटलेला नाही.






