Sunday, December 28, 2025

नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे गजबजले; डॉल्फिन सफारीसाठी मागणी

नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे  गजबजले; डॉल्फिन सफारीसाठी मागणी

गणपतीपुळ्यात १८ हजार पर्यटकांची हजेरी

रत्नागिरी : नाताळच्या सुट्टीसह जोडून आलेला विकेंड आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात पर्यटकांची लाट उसळली असून रत्नागिरी जिल्ह्यासह मालवण, देवगड आणि वेंगुर्ला तालुक्यांतील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. पर्यटक सागरी पर्यटनाचा आनंद लुटत आहेत.

पर्यटनस्थळे पर्यटकांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. देशाच्या पर्यटन नकाशावर ठळक ओळख असलेल्या गणपतीपुळे येथे एकाच दिवशी सुमारे १८ हजार पर्यटकांनी हजेरी लावत पर्यटन व्यवसायाला मोठा दिलासा दिला आहे. यासोबतच रत्नागिरी शहर, हर्णै, दापोली, गुहागर आदी ठिकाणीही पर्यटकांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.

नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ तसेच शेजारील राज्यांतून पर्यटक मोठ्या संख्येने रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. विशेषतः गणपतीपुळे मंदिर व समुद्रकिनारा, मत्स्यालय, पावस, भाट्ये, मांडवी, हर्णै-मुरूड, दापोलीतील समुद्र किनारे या ठिकाणी गर्दी लक्षणीय वाढली आहे. यामध्ये शालेय सहलींचीही मोठी भर पडल्याने पर्यटनस्थळे गर्दीने भरून गेली आहेत. गणपतीपुळे समुद्रकिनारी वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली असून जलक्रीडा, नौकाविहार, घोडेस्वारी यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल्स, लॉज, होमस्टे आणि पर्यटक निवासगृहे पूर्णतः भरलेली असून ‘नो रूम’ची स्थिती अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात दररोज साधारण ८ ते ९ हजार पर्यटक गणपतीपुळ्यात येत असून शनिवारी-रविवारी ही संख्या दुप्पट झाली आहे. सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी कोकणला पसंती दिल्याने रस्ते, समुद्रकिनारे आणि बाजारपेठा गजबजल्या आहेत. परिणामी स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, वाहनचालक, हातगाडीवाले, विक्रेते यांच्या आर्थिक उलाढालीत मोठी वाढ झाली आहे.

स्वच्छ किनारे, निसर्गसंपन्न परिसर, धार्मिक पर्यटन, समुद्रसौंदर्य आणि स्थानिक खाद्यसंस्कृती यामुळे रत्नागिरी जिल्हा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत असून नववर्षाच्या स्वागतासाठी येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनाला भक्कम चालना मिळाली असून कोकण पुन्हा एकदा पर्यटकांच्या पसंतीचे केंद्रबिंदू ठरत आहे.

पर्यटकांचे प्रमुख आकर्षण : मालवणमधील तारकर्ली, देवबाग, दांडी, चिवला, वायरी, आचरा, तोंडवळी या किनाऱ्यांबरोबरच वेंगुर्ला येथील वेळागर-शिरोडा आणि देवगड येथील मिठमुंबरी, कुणकेश्वर हे किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. मालवण येथील किनाऱ्यांवर असलेले त्सुनामी आयलँड, सिंधुदुर्ग किल्ला, निवती रॉक्स बेटे, जय गणेश मंदिर, राजकोट किल्ला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहिले आहेत.

जलक्रीडा प्रकारांना मागणी : जलक्रीडा प्रकारांप्रमाणे स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग, बनाना राइड, बंपर राईड, बोटिंग सफारी, आणि स्नॉर्कलिंगला पर्यटकांच्या उड्या पडत आहेत. तारकर्ली खाडीत बॅकवॉटर बोटिंग करणे एक वेगळाच अनुभव आहे. डॉल्फिन सफारीसाठी मोठी मागणी आहे.

माशांच्या दरात वाढ

मालवणी खाद्यसंस्कृती सर्वत्र प्रसिद्ध आहे. खासकरून मालवणी जेवण. पर्यटकांची गर्दी वाढल्यामुळे माशांचे रेट वाढले आहेत. सुरमई, पापलेट, प्राँन्स, या माशांना मोठी मागणी आहे. या पदार्थांचाही पर्यटक आनंद घेत आहेत.

Comments
Add Comment