मुंबई : गोरे रंग पे ना इतना गुमान कर…’ हे गाणं अनेकांना परिचित आहे. मात्र सध्या बॉलीवूडमधील गोऱ्या रंगामागचं वास्तव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. यूट्यूबर ध्रुव राठीच्या एका व्हिडीओमुळे अभिनेत्री दीपिका पादुकोणसह काही आघाडीच्या अभिनेत्रींवर स्किन लाइटनिंग आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सचे आरोप होत आहेत.
ध्रुव राठीने ‘द फेक ब्यूटी ऑफ बॉलीवूड सेलिब्रिटीज’ हा व्हिडीओ २५ डिसेंबर २०२५ रोजी यूट्यूबवर अपलोड केला. या व्हिडीओमध्ये त्याने दीपिका पादुकोणसह काजोल, बिपाशा बासू आणि प्रियांका चोप्रा यांनी विविध कॉस्मेटिक प्रक्रिया केल्याचा दावा केला आहे. राठीने दीपिकाच्या करिअरच्या सुरुवातीतील सावळा रंग आणि सध्याचा अधिक गोरा रंग यांची तुलना करत ग्लुटाथायोन इंजेक्शनचा उल्लेख केला आहे.
या व्हिडीओमध्ये नोज जॉब, लिप फिलर्स, फेस लिफ्ट यांसारख्या प्रक्रियांबाबत भाष्य करण्यात आलं असून, अशा ट्रीटमेंट्समुळे सामान्य लोकांमध्ये असुरक्षितता वाढते, असा दावा ध्रुव राठीने केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, रेडिट आणि एक्स वर जोरदार चर्चा रंगली आहे.
दरम्यान, दीपिका पादुकोणच्या चाहत्यांनी तिच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. लाईटिंग, एडिटिंग, कॅमेरा क्वालिटी आणि २००० च्या दशकातील टॅनिंग ट्रेंडमुळे दिसण्यात बदल जाणवतो, असा युक्तिवाद चाहत्यांनी केला आहे. काही चाहत्यांनी दीपिकाचे बालपणीचे फोटो शेअर करत तिचा मूळ त्वचेचा रंग अतिशय गोरा किंवा अतिशय काळा नसून मध्यम, काळासावळा असल्याचं सांगितलं आहे. काहींनी तर ध्रुव राठीचा द्वेष केला आहे.
या वादातून बॉलीवूडमधील रंगांबद्दल पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. नैसर्गिक बदल आणि वैद्यकीय प्रक्रियांमधील सीमारेषा किती अस्पष्ट आहे, यावरही चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर महिलांच्या वैयक्तिक निवडी आणि त्यावर होणारी सार्वजनिक टीका यावरही मतभेद व्यक्त होत आहेत.
सौंदर्य हे केवळ बाह्य नसून आंतरिक असतं, असा विचार अनेकांनी मांडला आहे. ध्रुव राठीच्या दाव्यांमुळे चर्चेला नक्कीच ठिणगी पडली असली, तरी दीपिका पादुकोणची कोणतीही निवड ही तिची वैयक्तिक बाब असल्याचं चाहत्यांनी ठामपणे सांगितलं आहे. ‘समर्थन हे सौंदर्यापेक्षा मोठं असतं’ हेच या वादातून पुन्हा अधोरेखित झालं आहे.






