Sunday, December 28, 2025

नववर्षात १६५ अतिरिक्त उपनगरीय लोकल सुरू होणार

नववर्षात १६५ अतिरिक्त उपनगरीय लोकल सुरू होणार

नव्या प्रकल्पांमुळे लोकल सेवांना वेग; प्रवाशांना दिलासा

मुंबई : पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांसाठी येत्या काळात विविध पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होणार असून, त्यामुळे उपनगरीय रेल्वे सेवांची संख्या वाढणार आहेत. नव्या मार्गिका, वाढीव प्लॅटफॉर्म आणि टर्मिनसच्या विकासामुळे लोकल सेवा अधिक सुरळीत होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.

येत्या वर्षात पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी विविध पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असून, यामुळे उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर तीन कारशेडमधून देखरेख केल्या जाणाऱ्या ११६ लोकल गाड्यांद्वारे दररोज १ हजार ४०६ उपनगरीय फेऱ्या चालवल्या जातात. मात्र, आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे.

मुंबई सेंट्रल–बोरिवली सहावी मार्गिका, बोरिवली–विरार पाचवी आणि सहावी मार्गिका तसेच विरार–डहाणू रोड तिसरी आणि चौथी मार्गिका यांसारखी महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर उपनगरीय वाहतूक मुख्य मार्गाच्या वाहतुकीपासून वेगळी होणार आहे. यामुळे लोकल सेवांसाठी अतिरिक्त क्षमता उपलब्ध होऊन प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. याचबरोबर हार्बर लाईनचा गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत विस्तार आणि वांद्रे ते अंधेरी दरम्यान प्लॅटफॉर्मची लांबी १५ डब्यांपर्यंत वाढवण्याचे कामही वेगाने सुरू आहे. ही कामे पूर्ण झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवर तब्बल १६५ अतिरिक्त उपनगरीय सेवा सुरू होणार आहेत. पश्चिम रेल्वेची क्षमता वाढवण्याची योजना तत्काळ, अल्प-मुदतीच्या आणि दीर्घ-मुदतीच्या टप्प्यांमध्ये राबवली जात असून, २०३० पर्यंत गाड्या हाताळण्याची क्षमता दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने ही क्षमता वाढवली जाणार असून, त्याचा थेट फायदा प्रवाशांना मिळणार आहे.

दरम्यान, लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी जोगेश्वरी येथे तीन प्लॅटफॉर्म असलेले नवीन टर्मिनस उभारले जात असून, हे काम पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. वसई रोड येथेही दोन नवीन प्लॅटफॉर्मसह नवीन टर्मिनस विकसित केला जात असून, त्याचे काम डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि दादर येथे नवीन प्लॅटफॉर्म, पिट लाइन आणि देखभाल सुविधांचे आधुनिकीकरण सुरू आहे. एकूणच, पश्चिम रेल्वेवरील ही पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाल्यानंतर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे संचालन अधिक सुरळीत होणार असून, मुंबईकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment