Saturday, December 27, 2025

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

Tragedy at Nagpur Bachelor Party : मैत्री की क्रूरता? पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून फेकून दिलं; बॅचलर पार्टीचा 'सैतानी' चेहरा समोर

नागपूर : नागपूर जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या मित्राच्या लग्नाची 'बॅचलर पार्टी' साजरी करण्यासाठी गेलेल्या आदित्य मोहिते या ३३ वर्षीय तरुणाला स्वतःच्याच मित्रांच्या टोकाच्या निष्काळजीपणामुळे जीव गमावावा लागला. विशेष म्हणजे, आदित्य बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी त्याचे मित्र रात्रभर पार्टी आणि नाचगाण्यात मग्न होते. वेळीच उपचार न मिळाल्याने या तरुणाचा दुर्दैवी अंत झाला असून, या प्रकरणी ११ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

सीसीटीव्ही फुटेजमधून बॅचलर पार्टीचा क्रूर चेहरा समोर

गेल्या महिन्यात १६ नोव्हेंबर रोजी नागपूरच्या एका फार्म हाऊसवर घडलेल्या आदित्य मोहिते या तरुणाच्या मृत्यू प्रकरणाने आता एक भयानक वळण घेतले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) समोर आले असून, त्यामध्ये माणुसकीला लाजवणारा प्रकार कैद झाला आहे. आदित्य जमिनीवर बेशुद्ध पडलेला असताना, शेजारीच असलेल्या टेबलवर त्याचे मित्र आरामात खाण्यापिण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. धक्कादायक म्हणजे, या मित्रांमध्ये एका डॉक्टराचाही समावेश होता, ज्याने मदतीसाठी हात पुढे करण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. आदित्यचा मित्र जोएल सिंग याच्या लग्नानिमित्त ही बॅचलर पार्टी आयोजित करण्यात आली होती. सर्व मित्र मद्यधुंद अवस्थेत असताना अचानक ३३ वर्षीय आदित्य बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आदित्य कोसळल्यानंतरही त्याच्या शेजारच्या टेबलवर बसलेल्या मित्रांच्या हालचालीत कोणताही बदल झाला नाही. त्यांनी केवळ एका बाजूला पडलेल्या आपल्या मित्राकडे पाहिले आणि पुन्हा आपल्या गप्पांत आणि जेवणात दंग झाले. या संपूर्ण घटनेत सर्वात संतापजनक बाब म्हणजे, तिथे उपस्थित असलेल्या मित्रांपैकी एक जण पेशाने डॉक्टर होता. वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती असूनही, आपल्या समोर एक तरुण बेशुद्ध पडला असताना त्या डॉक्टरने साधी तपासणी करण्याची तसदीही घेतली नाही. त्याला प्रथमोपचार देण्याऐवजी किंवा तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी, त्या डॉक्टरनेही इतर मित्रांप्रमाणेच निष्काळजीपणा दाखवला. याच बेजबाबदारपणामुळे आदित्यला वेळीच उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा हकनाक बळी गेला.

आईच्या संशयानंतर पोलिसांची कारवाई

आदित्यच्या आईने सुरुवातीपासूनच या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. मुलाच्या निधनानंतर आईने तक्रार केल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले आणि हा सर्व संतापजनक प्रकार उघडकीस आला. आपल्या मुलाला वाचवण्याची संधी असतानाही मित्रांनी त्याला मरणाच्या दारात सोडून दिले, हे पाहून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी आता त्या डॉक्टरसह ११ मित्रांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगवान केली आहेत.

पार्टीत अडथळा नको म्हणून बेशुद्ध मित्राला चादरीत गुंडाळून खोलीत फेकलं

नागपूरच्या खापा परिसरातील एका फार्म हाऊसवर पार पडलेल्या बॅचलर पार्टीत जे घडलं, ते ऐकून कोणाचेही मन सुन्न होईल. आपला मित्र आदित्य मोहिते हा डोळ्यादेखत बेशुद्ध पडलेला असताना, त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात नेण्याऐवजी एका चादरीत गुंडाळून फरपटत नेले आणि शेजारच्या खोलीत कोंडून दिले. केवळ आपल्या पार्टीत कोणताही व्यत्यय येऊ नये, या एका निर्दयी विचाराने या तरुणांनी आपल्याच मित्राला मरणाच्या दारात ढकलले. आदित्य बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या ११ मित्रांनी त्याला मदत करण्याऐवजी एखाद्या वस्तूंसारखे चादरीत गुंडाळले. त्याला फरपटत नेऊन एका निर्जन खोलीत टाकून दिले आणि हे सर्व नराधम मित्र पुन्हा आपल्या नाच-गाण्यात आणि खाण्यापिण्यात मग्न झाले. रात्रभर त्या बंद खोलीत आदित्य मृत्यूशी झुंज देत होता, मात्र बाहेर संगीताच्या तालावर मित्रांचा जल्लोष सुरू होता. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या या मित्रांना आपल्या मित्राच्या जिवापेक्षा पार्टीचा आनंद मोठा वाटला.

सकाळी जाग आली, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत हे सर्व मित्र झोपून होते. नशा उतरल्यानंतर जेव्हा एका मित्राने आदित्यच्या खोलीत जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. घाबरलेल्या मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जर आदल्या रात्रीच त्याला १० मिनिटे आधी उपचार मिळाले असते, तर आदित्य आज जिवंत असता, असे वैद्यकीय सूत्रांकडून समजते.

सीसीटीव्ही फुटेजने उघड केला 'सैतानी' चेहरा

सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत होता, मात्र आदित्यच्या भावाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर फार्म हाऊसचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या फुटेजमध्ये आदित्यला चादरीत गुंडाळून फरपटत नेतानाचे धक्कादायक दृश्य पाहून पोलीसही हादरले. याप्रकरणी खापा पोलिसांनी सर्व ११ मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे सर्व आरोपी जामिनासाठी धडपडत असून, या घटनेमुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >