पुणे : मुंबई आणि पुण्यासह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (उबाठा गट), शिवसेना (राज ठाकरे), मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित-शरद पवार) यांसह सर्व प्रमुख पक्षांनी तयारी केली होती. मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीतील मनसेच्या एन्ट्रीला विरोध दर्शवला होता. माजी मुख्यमंत्री आणि (उबाठा गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील एन्ट्रीसाठी पूर्ण वजन लावले, तर शरद पवार गटानेही राज ठाकरेंच्या पक्षासोबत जुळवून घेण्यास सहमती दर्शविली. तरीही काँग्रेसने नकार ठाम ठेवला. मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंच्या युतीनंतर काँग्रेसला स्वबळावर लढण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. पुण्यातही मनसे काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळाले आहेत.
पुण्यातील महाविकास आघाडीच्या रणनीतीसाठी शुक्रवारी हॉटेल शांताईत बैठक पार पडली, जिथे मनसेने सहभाग घेतला नाही. पुणे मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी स्पष्ट केले की, "एखाद्या शहरात आघाडी आणि दुसऱ्या शहरात आघाडी नाही हे जनतेच्या पचनी पडणार नाही. आघाडी असेल तर ती सर्व महाराष्ट्रासाठी असेल." याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेत मनसे काँग्रेससोबत जाण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी सांगितले.
मनसेने स्थापनेनंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून आमदार दिला आणि २०१२ च्या महापालिका निवडणुकीत २९ नगरसेवक निवडून आणले होते. त्यामुळे मुंबईनंतर पुण्यातही मनसेचा काही प्रभागांमध्ये प्रभाव दिसून येत आहे. उबाठाच्या शिवसेनेसोबतच्या युतीनंतर पुण्यात मनसे भाजप, अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसलाही धक्का देऊ शकते, असे राजकीय विश्लेषक सांगतात.






