Saturday, December 27, 2025

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

आंदेकर कुटुंबिय उतरलं आगामी निवडणुकीच्या रिंगणात! कडक पोलीस बंदोबस्तात केला उमेदवारी अर्ज दाखल

पुणे: यावर्षीच्या गणपतीमध्ये झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर न्यायालयीन कोठडीत आहे. बंडू आंदेकरला महापालिका निवडणुकीमध्ये उतरायचे होते, मात्र तो कोठडीत असल्यामुळे निवडणूक कशी लढवणार? याबाबत चर्चा सुरू असतानाच पुणे विशेष न्यायालयाने त्याला निवडणुकीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत.

न्यायालयाने दिलेल्या परवानगीमुळे बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सून सोनाली वनराज आंदेकर यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर अर्ज दाखल करण्यास आल्या होत्या. या दोघी सुद्धा कोल्हापूर जेलमध्ये असल्यामुळे त्यांना आज सकाळी पुण्यात अर्ज भरण्यासाठी आणण्यात आले. या दोघींचा अर्ज भरून झाल्यानंतर बंडू आंदेकर अर्ज भरणार आहे. बंडू आंदेकर प्रभाग २२ तर लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर २३ मधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार ३० डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्यामुळे आयुष कोमकर हत्या प्रकरणात कोठडीत असलेला बंडू आंदेकर, त्याची भावजय लक्ष्मी, सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढविण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून, त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, असा अर्ज आंदेकर यांच्या वतीने अॅड. मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता. यावर 'निवडणूक लढविणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे', असे सांगत विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >