खोपोली : खोपोली नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची शुक्रवारी सकाळी अज्ञात मारेकऱ्यांनी हत्या केली. या हल्ल्यानंतर खोपोली शहरात खळबळ उडाली. काळोखे यांच्या हत्येच्या निषेधार्थ खोपोलीत बंद पाळण्यात आला. हल्लेखोरांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मयत मंगेश काळोखे यांचा पुतण्या राज काळोखे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अजित पवार पक्षाचे रवींद्र देवकर यांची दोन मुले दर्शन आणि धनेश व त्यांचे अंगरक्षक तसेच खुनाच्या कटाला सहकार्य केल्याप्रकरणी अजित पवार गट राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ता भरत भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश काळोखे हे सकाळी सात वाजता, त्यांच्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत होते. यावेळी एका वाहनातून चार ते पाच अज्ञात इसम तिथे आले. त्यांनी धारदार शस्त्रांनी काळोखे यांच्यावर हल्ला चढवला. ज्यात काळोखे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खोपोली परिसरात एकच खळबळ उडाली. सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते म्हणून मंगेश काळोखे सुपरिचीत होते.
काळोखे यांच्या पत्नी नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमधून शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर खोपोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामाकरून मृतदेह शासकीय रुग्णालयात आणला. शवविच्छेदनानंतर या प्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. आरोपी पोलिसांना सापडले नसल्यामुळे महिलांनी आक्रोश केला असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान फरार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस तपास करत आहेत. या घटनेनंतर खोपोली परिसरात वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी खोपोलीत दाखल झाले असून, त्यांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.






