Saturday, December 27, 2025

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

Shilpa Shetty...शिल्पा शेट्टी प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय, AI मॉर्फ कंटेंटवर बंदी

मुंबई : आजकाल सोशल मीडियाचा गैरवापर सर्रासपणे केला जातो. मागील काही दिवसात अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे देखील मॉर्फ केलेली चित्रे व्हायरल झाली होती, यात न्यायालयाने हस्तक्षेप करत अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावाने समाज माध्यमांवर व्हायरल झालेली एआयद्वारे तयार केलेली मॉर्फ छायाचित्रे, व्हिडिओ आणि डीपफेक कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससह एआय लिंकद्वारे प्रसारित होणारा हा सर्व मजकूर हटवावा, असे स्पष्ट निर्देश न्यायमूर्ती अद्वैत एम. सेठना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने दिला आहे.

हा प्रकार अत्यंत धक्कादायक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः महिलेला, तिच्या संमतीशिवाय आणि तिच्या गोपनीयतेच्या मूलभूत हक्कावर गदा येईल अशा पद्धतीने चित्रित करता येत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले.

शिल्पा शेट्टीने व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण, प्रतिमेचा कथित गैरवापर आणि डीपफेक कंटेंटविरोधात उच्च न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने एआयच्या वापरातून तिचा आवाज, हावभाव आणि प्रतिमा नक्कल केल्याचा मुद्दा गंभीर असल्याचे नमूद केले.

याचिकेनुसार, शिल्पा शेट्टीच्या परवानगीशिवाय तिची मॉर्फ केलेली छायाचित्रे वापरून पुस्तके आणि विविध वस्तू तयार करण्यात आल्या. या प्रकारामुळे तिची बदनामी होण्याची, अश्लील विनोदांचा विषय बनण्याची आणि मानसिक त्रास सहन करण्याची शक्यता असल्याचा दावा तिने केला आहे.

न्यायालयाचा दिलासा

उच्च न्यायालयाने सर्व संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि एआय लिंकवरून मॉर्फ छायाचित्रे, व्हिडिओ आणि डीपफेक कंटेंट तात्काळ हटवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणीपर्यंत अशा स्वरूपाचा कोणताही मजकूर प्रसारित करू नये, असे स्पष्ट निर्देश देत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नुकसानभरपाईची मागणी

शिल्पा शेट्टीने याचिकेत संबंधित व्यक्तींकडून पाच लाख रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. तिच्या प्रतिमेचा गैरवापर करून आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही तिने केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात अंतरिम दिलासा देत संबंधित कंटेंट हटवण्याचे आदेश कायम ठेवले आहेत.

हा निर्णय डीपफेक आणि एआयच्या गैरवापराविरोधात महत्त्वाचा मानला जात असून, सेलिब्रिटींसह सर्वसामान्य नागरिकांच्या गोपनीयतेच्या हक्कांबाबत न्यायालयाने ठोस भूमिका घेतल्याचा संदेश यातून जात आहे.

Comments
Add Comment