Saturday, December 27, 2025

शरद पवारांची अजित पवारांसोबत आघाडी फिस्कटली, मविआसोबत जाण्याची तयारी

शरद पवारांची अजित पवारांसोबत आघाडी फिस्कटली, मविआसोबत जाण्याची तयारी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांनी एकत्रित लढण्यावर शिक्कामोर्तब केले असले तरी जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. तर दुसरीकडे पुण्याच्या राजकारणातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि अजित पवार यांची स्थानिक युती चर्चेत होती. मात्र शरद पवारांनी मविआसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात चिन्हावरून मतभेद झाल्यामुळे आघाडीची बोलणी अयशस्वी झाल्याचा अंदाज आहे. अजित पवारांनी शरद पवारांना अवघ्या तीस ते पस्तीस जागा आणि घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची अट घातली असल्याची माहिती समोर आली होती. या अटीवर शरद पवार गटाचे नेते आणि माजी महापौर अंकुश काकडे व माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती होस्टेलवर काल (२६ डिसेंबर) रात्री भेट घेतली. यावेळी शरद पवार गट तुतारी चिन्हासाठी ठाम असल्याने आणि ३५ जागा देण्याचा प्रस्तावही अमान्य असल्याने आघाडीची चर्चा फिस्कटल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, याबाबत शरद पवार आणि अजित पवार यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केली नसून पक्षातील नेते माहित देत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा