खासदार,आमदार आता भावाला बनवणार नगरसेवक
विक्रोळीतील प्रभाग १११मधून इच्छुक म्हणून दावेदारी
उबाठाचे दिपक सावंत, दत्ताराम पालेकर यांचा कापणार पत्ता?
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कधीही पक्षाच्या शाखेत दिसला नाही, कधीही संघटनेचे काम केले नाही तरी राजकारणापासून दूर असलेल्या आपल्या भावाला उबाठाचे नेते आणि खासदार संजय राऊत उमेदवारी देण्यास इच्छुक आहे. विक्रोळीतील प्रभाग क्रमांक १११ हा ओबीसी आरक्षित झाल्याने या प्रभागातून संजय राऊत हे आपल्या धाकट्या भावाला संदीप राऊत यांना निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत. संदीप राऊत यांना उमेदवारी देण्यास संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत हे ठाम असल्याने दिपक सावंत आणि दत्ताराम पालेकर यांच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना डावलले जाणार आहे. म्हणजे खासदार, आमदार आणि नगरसेवक पद आपल्याच घरात असावे यासाठी पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकाला लाथाडून आपल्या भावाला उमेदवारी देण्याचा प्रयत्न राऊतांकडून केली जात असल्याने विभागात दबक्या आवाजात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
विक्रोळी विधानसभेतील प्रभाग क्रमांक १११ मध्ये भाजपाच्या सारीका पवार या निवडून आल्या आहेत. या प्रभागामध्ये मंगेश पवार आणि सारीका पवार यांचे मजबूत प्रस्थ असून आगामी निवडणुकीसाठी हा प्रभाग ओबीसी आरक्षित झाल्यानंतर स्थानिक आमदार सुनील राऊत यांनी ओबीसी प्रमाणपत्र असल्याने दिपक सावंत आणि दत्ताराम पालेकर यांना तयारीत राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवार म्हणून आपली सेटींग लावण्यास सुरुवात केली होती. परंतु या प्रभागात या दोन्ही इच्छुक उमेदवारांची नावे चालत असतानाच संदीप राऊत यांच्याकडून सोशल मिडियावर प्रभाग क्रमांक १११मधून इच्छुक प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. संदीप राऊत यांचे नाव पुढे आल्याने तसेच पैसे खर्च करण्याइतपत इच्छुक उमेदवार सक्षम नसल्याने ही दोन्ही नाव मागे पडली गेली आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संदीप राऊत यांचा पक्ष संघटनेशी काही संबंध नाही. ते केवळ खासदार आणि पक्षाचे नेते संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांचे बंधू आहेत. पण या पलिकडे त्यांची ओळख काहीच नाही. त्यांचे स्वत:चे चायनीजचे छोटे हॉटेल आहे. पण हे हॉटेल शाखेच्या समोर असूनही ते कधी शाखेत येत नाहीत. त्यामुळे आजवर कधी पक्षाच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली ना त्यांनी आंदोलनात भाग घेतला. पण आता निवडणूक येताच त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. म्हणजे खासदार, आमदार आणि आता नगरसेवकही या एकाच घरात दिला जाणार असेल तर शिवसैनिकांनी फक्त् संघटना वाढवण्यासाठी आंदोलने करून केसेस अंगावर घ्यायच्या का असा सवाल स्थानिकांकडून दबक्या आवाजात केला जात आहे.






