'जाणता राजा फाऊंडेशन'चा २७-२८ डिसेंबरला महोत्सव
पालघर : पालघर तालुक्यातील पास्थळ येथील 'जाणता राजा फाऊंडेशन' आणि मीडिया पार्टनर 'दैनिक प्रहार'च्या संयुक्त विद्यमाने यंदा पालघरमध्ये मनोरंजनाचा आणि बक्षिसांचा महाकुंभ होणार आहे. पास्थळ व परिसरातील नागरिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी पास्थळच्या आंबटगोड मैदानावर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'दैनिक प्रहार पुरस्कृत' दोन विशेष भव्य स्पर्धा! यामध्ये महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' आणि तरुणाईसाठी 'लोकधारा नृत्य स्पर्धा' रंगणार असून, पैठणी साडी, रोख रकमा आणि घरगुती उपकरणांच्या रूपात बक्षिसांची मोठी लूट करण्याची सुवर्णसंधी नागरिकांना मिळणार आहे.
सहभागाचे आवाहन : जाणता राजा फाउंडेशन वर्षभर सामाजिक आणि क्रीडा कार्यात अग्रेसर असते. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष उमेश भरत, सचिव हितेश राऊत, खजिनदार निपुल घरत, सहसचिव जितेश घरत आणि सह-खजिनदार सौरभ घरत यांच्यासह सर्व पदाधिकारी मेहनत घेत आहेत. तरी या महोत्सवाचा पास्थळ आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
२७ डिसेंबर : चिमुकल्यांचा उत्साह आणि सुरेल सायंकाळ
महोत्सवाचा शुभारंभ शनिवार, २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. पहिल्या दिवशी प्रामुख्याने बालकांसाठी विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
- रंगभरण स्पर्धा : ४ ते ७ वर्षे वयोगटातील मुलांसाठी.
- वेशभूषा स्पर्धा : ५ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळणार आहे.
- लाईव्ह आर्केस्ट्रा : सायंकाळी सुरेल गाण्यांच्या कार्यक्रमात नागरिक मंत्रमुग्ध होतील.
२८ डिसेंबर : 'दैनिक प्रहार' पुरस्कृत भव्य स्पर्धां आणि आकर्षक बक्षिसे
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, २८ डिसेंबर रोजी स्पर्धांचा खरा थरार अनुभवायला मिळेल. 'दैनिक प्रहार' पुरस्कृत दोन मोठ्या स्पर्धा यावेळी आकर्षण ठरणार आहेत.
१. खेळ पैठणीचा (सायंकाळी ४:३० वा.)
घरातील कर्तृत्ववान महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल पाच आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे :
१. प्रथम क्रमांक : सुंदर पैठणी साडी
२. द्वितीय क्रमांक : डिनर सेट
३. तृतीय क्रमांक : फ्राय पॅन
४. चौथा क्रमांक : स्टायलिश पर्स
५. पाचवा क्रमांक : सुवर्णदीप
२. भव्य महाराष्ट्र लोकधारा (फोक डान्स) स्पर्धा (सायंकाळी ६.३० वा.)
आपली संस्कृती आणि ऊर्जा दाखवण्यासाठी ही मोठी संधी आहे. विजेत्यांना खालीलप्रमाणे रोख पारितोषिके व ट्रॉफी प्रदान करण्यात येतील.
- प्रथम क्रमांक : ७,५०० रुपये + आकर्षक ट्रॉफी
- द्वितीय क्रमांक : ५,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी
- तृतीय क्रमांक : ३,००० रुपये + आकर्षक ट्रॉफी