वॉशिंग्टन डी. सी. : ऐन नाताळच्या सुट्टीत अमेरिकेत कार्यरत विमान कंपन्यांची १८०० पेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. विमान प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक जण वेगवेगळ्या विमानतळांवर अडकून पडले आहेत. सुट्टीत फिरायला जाण्याची योजना आखणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. हिमवादळामुळे उड्डाणे रद्द झाल्याचे सांगितले जात असले तरी ऐन सुट्टीच्या काळात मोठ्या संख्येने उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे नियोजन पुरते कोलमडले आहे. दुसरीकडे कॅलिफोर्नियातील विनाशकारी पुरामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
देशाच्या मोठ्या भागात डेव्हॉन वादळाने थैमान घातल्याने ईशान्य आणि मध्यपश्चिम भागात जोरदार हिमवृष्टी झाली, तर कॅलिफोर्नियामध्ये विक्रमी पाऊस पडला, त्यामुळे सुट्टीतील प्रवासावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत विमान कंपन्यांनी १८०२ उड्डाणे रद्द केली आहेत. तसेच २२ हजारांपेक्षा जास्त उड्डाणांना विलंब झाला. यामुळे अनेकांचे हाल झाले.
अप्पर मिडवेस्ट, ईशान्य आणि मिड-अटलांटिक प्रदेशात मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली. हिमचटवृष्टी, गारपीट आणि गोठवणारी थंडी यामुळे हवाई प्रवास विस्कळीत झाला. न्यू यॉर्कमधील प्रमुख विमानतळ - जॉन एफ. केनेडी इंटरनॅशनल, नेवार्क लिबर्टी आणि लागार्डिया येथून होणारी विमान वाहतूक पुरती कोलमडली. अनुक्रमे जेटब्लू, डेल्टा एअर लाइन्स, रिपब्लिक एअरवेज आणि अमेरिकन एअरलाइन्स यांनी अनेक उड्डाणे रद्द केली.
विमान वाहतूक कोलमडल्यामुळे फटका बसलेल्यांना बदल शुल्क माफ केल्याचे अमेरिकन एअरलाइन्स, युनायटेड एअरलाइन्स आणि जेटब्लूच्या प्रवक्त्यांनी सांगितले. कंपन्यांनी प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकेतील विविध प्रांतांच्या प्रशासनाने नागरिकांना उड्डाण रद्द झाले अथवा विलंबाने होत असले तरी विमानतळ सोडून इतरत्र जाणे टाळा, असे आवाहन केले आहे.
न्यू यॉर्क शहर आणि आसपासच्या भागात प्रति तास एक ते दोन इंच हिमवृष्टीचा अंदाज आहे. अमेरिकेतील काही भागांमध्ये ११ इंचांपर्यंत हिमवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ईशान्य अमेरिकेत हिमवादळाने मोठा तडाखा दिला. कॅलिफोर्नियामध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली, रस्ते पाण्याखाली गेले, भूस्खलन झाले आणि मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा खंडित झाला. तीन लोकांचा मृत्यू झाला.






