आता उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू ; बावनकुळे
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप अंतिम झाले असून, आता उमेदवारांच्या नावांची अंतिम यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी दिली.
बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र बसून महायुतीच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली आहे. तिढा जवळपास सुटला आहे. आमच्या जागांवर आम्ही उमेदवार अंतिम करत आहोत. ज्या ठिकाणी वाद असतील ते चर्चेने सोडवले जातील. पण ९० ते ९५ टक्के जागांवर कोणतीही अडचण नाही," असे बावनकुळे यांनी सांगितले.
भाजपची मुंबईत १३ मित्रपक्षांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. रिपाई, नागपुरातील जोगेंद्र कवडे आणि जयदीप कवडे यांच्याशीही संवाद सुरू आहे. त्या-त्या पातळीवर, त्या-त्या ठिकाणी, त्या-त्या पक्षाची क्षमता पाहून चर्चा सुरू आहे. या पक्षांना भाजप किंवा शिवसेनेच्या कोट्यातून जागा दिल्या जातील, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
शरद पवार एनडीएत येणार का? या प्रश्नावर बावनकुळे यांनी भाष्य करण्यास नकार दिला. ते म्हणाले, "एनडीएचे निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. हा अधिकार केंद्रीय भाजपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा याविषयी ठरवतील. महाराष्ट्रात आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजप-सेना महायुती म्हणून लढत आहोत. स्थानिक पातळीवर युती ठरत आहेत. त्याचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही", असेही त्यांनी स्पष्ट केले.






