रवींद्र तांबे
नववर्ष म्हणजे केवळ कॅलेंडरवरील तारीख बदलण्याचा क्षण नव्हे, तर आत्मपरीक्षणाचा, संकल्पांचा आणि नव्या आशांचा प्रारंभ असतो. सरत्या वर्षाला निरोप देत आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत करताना आपण काय कमावले, काय गमावले आणि पुढे काय साध्य करायचे याचा विचार होणे आवश्यक ठरते. विशेष म्हणजे २०२६ हे वर्ष राज्यासाठी ‘भरती वर्ष’ म्हणून घोषित झाल्याने सुशिक्षित बेरोजगारांच्या मनात नव्या संधींची आशा पल्लवित झाली आहे. त्यामुळे हे नववर्ष उत्सवापुरते न राहता रोजगार, जबाबदारी आणि परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याचे प्रतीक ठरणार आहे.
सन २०२६ हे वर्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भरती’ वर्ष म्हणून ५ ऑक्टोबर २०२५ रोजी घोषित केले आहे. केव्हा एकदा २०२६ साल सुरू होऊन भरती होते असे राज्यातील सुशिक्षित बेकारांना वाटत आहे. त्यामुळे राज्यामधील सुशिक्षित बेरोजगारसुद्धा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयार आहेत. नवीन वर्षामध्ये रोजगाराच्या विविध संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करताना सुशिक्षित बेरोजगारांच्या दृष्टिकोनातून भरती वर्ष म्हणून नववर्षाचे स्वागत केले जाणार आहे.
आपण अजून चार दिवसांनी सरत्या वर्षाला ‘गुड बाय’ आणि नववर्षाला ‘वेलकम’ करणार आहोत. असे आपण दरवर्षी करत असतो. मात्र त्यातून आपण काय शिकलो याचा आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आपण आनंद व्यक्त करीत असताना मागील वर्षात माझे काय चुकले याचे प्रत्येकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. आज आपला देश ७९ व्या स्वातंत्र्य वर्षांत वावरताना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला तरी देशात खरंच आपण स्वातंत्र झालो का? याचा विचार सुद्धा होणे आवश्यक आहे. असे असले तरी बऱ्याचवेळा मागील वर्षामध्ये आलेली संकटे विसरून नवीन आठवणी जतन करीत असतो. अनेक लोक घरामध्ये रोषणाई व घराच्या समोर फटाक्यांची आतषबाजी करतात. म्हणे झाले गेलं विसरून नवीन जीवनाला सुरुवात करूया.
महत्त्वाची बाब म्हणजे मागील वर्षाचा अनुभव गृहीत धरून, नव्या वर्षात नवीन उद्दिष्टे लक्षात घेऊन नवीन जीवनाला सुरुवात करू शकतो. यातून नवीन संधी मिळून नवीन दृष्टिकोन स्वीकारला जातो. म्हणजे आपल्या जीवनात सुधारणा करण्याची हीच वेळ असते. यातूनच नवीन प्रवास करण्याची अचूक वेळ मिळते. तेव्हा प्रत्येकांनी नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्या मागील वर्षातील चुका सुधारून नवीन वर्षात आपल्याला कसा फायदा होईल याचा शोध घेणे गरजेचे असते. यातूनच आपली प्रगती होत असते.
नवीन वर्ष, नवीन सुरुवात असे जरी म्हणालो तरी यातून परिवर्तन होत असते. यासाठी नवीन संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो. यातूनच विकासाची नवीन संधी प्राप्त होत असते. यात काही उद्दिष्ट्ये लक्षात घेता प्राधान्यक्रमानुसार सोडवू शकतो. यातूनच आपला उत्साह वाढण्यास मदत होते. आपल्या मनातील भीती दूर होऊन चांगल्या संधीचा मार्ग मोकळा होतो. त्यामुळे आपण नवीन वर्षानिमित्ताने जी उद्दिष्ट्ये डोळ्यांसमोर ठेवतो त्याविषयी आपला आत्मविश्वास वाढून आपण प्रेरित होतो.
नवीन वर्षाचे स्वागत करून नवीन वर्षाची सुरुवात करीत असतो तेव्हा मागील वर्षाचा विचार करणे गरजेचे आहे. आपण सर्वजन विविध क्षेत्रांत काम करत असताना आपण केलेले चांगले काम आणि काही कामात आलेले अपयश त्याचा आढावा घ्यावा. तसेच आपण मागील वर्षी कोणकोणती कामे केली अथवा नाही केली याचे चिंतन करून सुधारणा करण्यात याव्यात.
आता वर्ष सुरू झाल्यावर आपली उद्दिष्टे निश्चित करून विविध क्षेत्रांनुसार वर्गवारी करावी. त्यानंतर त्यांची क्रमवारी लावून त्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा. असे टप्प्याटप्प्याने करावे. म्हणजे वर्षभरामध्ये निश्चित केलेली उद्दिष्टे किती प्रमाणात साध्य झाली याची सहज कल्पना येते. याचा परिणाम पुढील काळात विकासाची दिशा ठरवू शकतो. असे असले तरी प्रत्येक उद्दिष्टांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे. यामुळे आपल्या प्रगतीची कल्पना येते. तेव्हा आपल्याला प्रेरणा कशी मिळेल या दृष्टिकोनातून काम करावे. जेणेकरून आपण जी उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत त्या संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा. आपले लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. यासाठी चांगल्या लोकांच्या सहवासात राहाणे, नियमितपणे व्यायाम, मान्यताप्राप्त पुस्तकांचे वाचन करावे. इतकेच नव्हे तर आपल्या मनाची सुद्धा तयारी असणे आवश्यक आहे. एखादा कठीण वाटणारा विषय कसा सोपा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करावा. आपण ठरविलेली उद्दिष्टे इतरांना सुद्धा सांगा. उद्दिष्टांच्या प्रगतीचा वेळच्या वेळी आढावा घ्या. ज्या उद्दिष्टांमध्ये आपण यशवंत झालो असू त्यांचा छोटेखानी यशस्वी विजय म्हणून साजरा करा. यात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊ नये. नवीन वर्ष म्हणजे अंतिम परीक्षेचे वर्ष. त्यामुळे होणारी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते. तेव्हा त्यांनी आपले लक्ष अभ्यासाकडे केंद्रित करावे.
आता २०२६ या नवनिर्वाचित वर्षात पदार्पण करीत असताना प्रत्येकांनी लक्षात ठेवले पाहिजे की, नवीन वर्ष आहे तेव्हा मागील वर्षातील काही कटू अनुभव आलेले असतील, तर त्यांना बाजूला ठेवून परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करूया. भूतकाळ विसरून भविष्यकाळाचा विचार करूया. हे वर्ष भरती वर्ष असून वर्षभरात कशाप्रकारे भरती केली जाणार आहे याची सुद्धा सर्वांना कल्पना येणार आहे. तेव्हा भरती सत्र चालू असताना कोणावर अन्याय होणार नाही यावर करडी नजर ठेवायला हवी. कारण लोकशाहीप्रधान भारत देशाचे आपण सुजाण नागरिक आहोत याची जाणीव सर्वांना आहे. त्यामुळे आपला २०२६ या वर्षातील प्रवास सुखद होण्यासाठी वचनबद्द होऊ या.