Friday, December 26, 2025

विदर्भातले बोधप्रद निवडणूक निकाल

विदर्भातले बोधप्रद निवडणूक निकाल

अविनाश पाठक

आठवड्याच्या सुरुवातीलाच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीने विदर्भातील राजकीय चित्र स्पष्ट केले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक नगराध्यक्षपदे जिंकत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले, तर काँग्रेसनेही ग्रामीण भागात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निकालातून राज्यातील दिग्गज नेत्यांची ताकद, काहींचा प्रभाव कमी झाल्याचे संकेत, तसेच घराणेशाहीविरोधात मतदारांचा बदलता कल ठळकपणे समोर आला आहे. विदर्भातील हे निकाल सर्वच पक्षांसाठी दिशादर्शक ठरणारे आहेत.

आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे रविवारी महाराष्ट्रात नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी पार पडली. विदर्भात देखील नगर परिषद आणि नगरपंचायती मिळून शंभर ठिकाणी मतमोजणी झाली. त्यात सर्वात अधिक ५२ ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणून भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला. दुसऱ्या क्रमांकावर २१ जागा घेत काँग्रेसने बाजी मारली आहे. तिसऱ्या क्रमांकावर शिंदे यांची शिवसेना आठ जागा, त्या खालोखाल अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस चार जागा घेऊन थांबली आहे. उबाठा सेनेला देखील चार नगराध्यक्ष पदे मिळाली, तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचाही प्रत्येकी एक नगराध्यक्ष निवडून आला. अपक्ष आणि अन्य आठ जागी नगराध्यक्ष विजयी झाले आहेत.

याशिवाय नगरसेवक निवडीत देखील भारतीय जनता पक्षानेच आघाडी घेतलेली दिसत आहे. अनेक ठिकाणी तर अध्यक्ष जरी काँग्रेसचा असला, तरी सदस्य भाजपच्याच बहुमतात आहेत, असेही चित्र दिसत आहे. विदर्भात भारतीय जनता पक्षाचा आजही चांगलाच जोर आहे हे चित्र स्पष्ट झाले आहे. नगर परिषद निवडणुका या जरी स्थानिक स्तरावरील असल्या तरी त्यात अनेक राज्यस्तरीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसून येत होती. विदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आशीष जयस्वाल, परिणय फुके, विजय वडेट्टीवार इत्यादी नेते आपली बाजी राखण्यात यशस्वी झाले आहेत, तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जरोखे घोटाळा प्रकरणात आमदारकी गमवावी लागणारे माजी मंत्री सुनील केदार, माजी विधानसभा अध्यक्ष आणि माजी काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, राज्यमंत्री पंकज भोयर, माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर हे आपल्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या पत्नीचा पराभव देखील टाळू शकलेले नाहीत. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना देखील मतदारांनी नाकारलेले दिसत आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात १५ नगर परिषद आणि १२ नगरपंचायतींपैकी २२ ठिकाणी भाजपनेच आपला झेंडा रोवला आहे. रामटेक आणि पारशिवनीत आशीष जयस्वाल यांच्या शिवसेनेने देखील आपले खाते उघडले आहे. नागपूर जिल्ह्यात मोहोपा वगळता काँग्रेसला कुठेही जागा मिळाली नाही. भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी आपले परंपरागत वैरी सुनील केदार यांच्या सर्वच उमेदवारांना धूळ चारली आहे. रामटेक लोकसभा क्षेत्रातील खासदार श्याम कुमार बर्वे यांच्या उमेदवारांचाही पराभवच झालेला दिसतो आहे. हिंगण्यातील भाजप आमदार समीर मेघे यांच्या क्षेत्रातील नगर परिषदांमध्ये देखील भाजपचा जोर राहिलेला दिसत आहे. वर्ध्यात भाजप शिवसेना युती आणि काँग्रेसप्रणीत आघाडी यांनी अर्ध्या जागा वाटून घेतल्याप्रमाणे दिसत आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपला वर्धा जिल्ह्यात तीन नगराध्यक्षपदावर पाणी सोडावे लागले. वर्धा आणि देवळी येथे जरी नगराध्यक्षपद गेले तरी नगरसेवकांचे बहुमत आहे. यावेळी हिंगणघाट, आर्वी, सिंधी रेल्वे येथे नगराध्यक्षपदी भाजप उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसने वर्धा पुलगाव येथे आपले नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत. विशेष म्हणजे भाजप नेते आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नीला देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपने जोर मारला होता मात्र काँग्रेसने तब्बल सात नगर परिषदांवर आपले वर्चस्व कायम राखले आहे. दोन जागा शिवसेना शिंदे गटाला तर भाजपला फक्त एका नगर परिषदेत आपला अध्यक्ष निवडून आणता आला आहे. इथे काँग्रेसच्या सर्व निवडणुकांचे नियोजन विधानसभेतील काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. त्यामुळे यशाचे मानकरी तेच ठरले आहेत. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे, किशोर जोरगेवार, करण देवतळे असे चार आमदार असतानाही हा अपयशाचा सामना करावा लागला आहे. या अपयशाबाबत माजी मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पक्ष नेतृत्वावरच टीका केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही नगर परिषदांवर भाजपने आपला झेंडा फडकवला आहे. चंद्रपूरचे गडचिरोलीचे पालकमंत्री असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गोंदिया जिल्ह्यात गोंदिया तिरोडा नगर परिषद आणि सालेकसा व गोरेगाव नगरपंचायतीत सत्ताधारी भाजपला केवळ एक जागा रिक्त झाली, तर काँग्रेसने तीन जागा जिंकल्या. गोंदिया नगर परिषदेत प्रफुल्ल पटेल, भाजपचे आमदार विनोद अग्रवाल आणि गोपालदास अग्रवाल यांनी पूर्ण ताकद लावली होती. मात्र त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही. भंडारा जिल्ह्यात भंडारा तुमसर पवनी आणि साकोली या चार नगर परिषदांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची इथे चांगलीच पिछेहाट झाली आणि शिंदे सेनेला देखील इथे यश मिळवता आले नाही. अमरावती जिल्ह्यात दहा नगर परिषद आणि दोन नगरपंचायतींचा निकाल भाजपला चांगलाच धक्का देणारा ठरला आहे. भाजपला सहा नगराध्यक्षपदे, काँग्रेसला दोन, प्रहार, उबाठा, शिंदे सेना आणि अपक्ष प्रत्येकी एक असे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.

यावेळी ग्रामीण भागात काँग्रेसने बऱ्यापैकी जोर मारल्याचे दिसून आले आहे. चिखलदरा येथे काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. यवतमाळ जिल्ह्यात पंधरा ठिकाणी निवडणुका झाल्या. त्यात राष्ट्रवादी पक्षाचे इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या पुसदमध्ये विजयी झाल्या. यवतमाळमध्ये आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके या विजयी झाल्या आहेत. उमरखेडमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारव्हा व नेर नवापूर नगर परिषदांवर सेनेचा भगवा फडकला आहे. दिग्रस नगर परिषद अध्यक्षपदी उबाठा सेनेचा उमेदवार विजयी झाला आहे. वाशिम जिल्ह्यात चार नगर परिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत माजी आमदारांसह विद्यमान आमदार अमित झनक यांनाही मतदारांनी धक्का दिला आहे. रिसोड नगर परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचा तर मालेगावात शिंदे सेनेचा उमेदवार विजयी झाला. कारंजा नगर परिषदेत एमआयएमचा नगराध्यक्ष विजयी झाल्याने भाजप आमदार सई डहाके यांच्यासाठी तो धक्काच ठरला आहे. या मतदारसंघात नेत्यांच्या नातेवाइकांना देखील मतदारांनी नाकारलेले दिसून आले आहे.

अकोला जिल्ह्यातही नेत्यांच्या नातेवाइकांना मतदारांनी नाकारलेले दिसून आले आहे. भाजप आमदार हरीश पिंपळे यांचे भाऊ मूर्तिजापूर नगर परिषदेत पराभूत झाले. बाळापूर नगर परिषदेत माजी आमदार नातेपुते यांच्या पत्नी रजिया बेगम यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. अकोल्यातही काँग्रेसचे नेते दीपक बोडखे यांच्या पत्नींचाही पराभव झाला. एकूणच अकोल्यात मतदारांनी आता घराणेशाही थांबवा हा संदेश दिल्याचे दिसून आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे चार, तर काँग्रेसचे तीन नगराध्यक्ष विजयी झाले. चिखली खामगाव नांदुरा आणि जळगाव जामोद येथे भाजपचे, तर लोणार-मलकापूर आणि शेगावमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले. शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट आणि उबाठासेना प्रत्येकी एका ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणू शकले आहेत. मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांच्या उमेदवारांना देखील फटका बसलेला दिसून आला आहे.

एकूणच विदर्भाचे सर्व निकाल बघता इथे भाजपने आपले एकहाती वर्चस्व सिद्ध केलेले दिसून आले आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसने देखील आपले अस्तित्व कायम राखले आहे. एका काळात विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अजूनही ग्रामीण विदर्भात काँग्रेसचे नेटवर्क कायम आहे, हे या निकालातून दिसून आले आहे. त्यातही भाजपमध्ये काही ठिकाणी असलेला अंतर्गत संघर्ष त्यांना अडचणीचा ठरला आहे. अन्यथा भाजप काँग्रेसला देखील रोखू शकला असता अशी परिस्थिती होती मात्र चंद्रपुरात मुनगंटीवार, जोरगेवार आणि हंसराज जाहीर यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे चंद्रपूरमध्ये भाजपचे असे पानिपत झालेले दिसून आले आहे. आता विदर्भात चार महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निकालातून सर्वच पक्षांनी घ्यायचा तो बोध घेऊन वाटचाल करायची आहे. त्यावरच सर्व पक्षांचे महापालिका निवडणुकातील यशापयश ठरणार आहे.

Comments
Add Comment