मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठी तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचे नेतृत्व मुंबईकर आयुष म्हात्रेकडे आहे. विहान मल्होत्राकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. वैभव सूर्यवंशी याचाही संघात समावेश केला आहे.
🚨 News 🚨 India's U19 squad for South Africa tour and ICC Men’s U19 World Cup announced. Details▶️https://t.co/z21VRlpvjg#U19WorldCup pic.twitter.com/bL8pkT5Ca2
— BCCI (@BCCI) December 27, 2025
क्रिकेटचा १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये होणार आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया यांनी संयुक्तपणे १९ वर्षांखालील विश्वचषकाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत १६ संघ चार गटात विभागण्यात आले आहेत. प्रत्येक गटात चार संघ आहेत. भारताचा समावेश अ गटात अर्थात ए ग्रुपमध्ये झाला आहे. भारताला साखळी सामन्यांच्या फेरीत अ गटातील अर्थात ए ग्रुपमधील अमेरिका, बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध खेळायचे आहे. भारताचा पहिला सामना १५ जानेवारी रोजी अमेरिकेच्या विरोधात आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर आठ फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित होतील. उपांत्य फेरीतून दोन विजयी संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यानंतर अंतिम सामना होईल. अंतिम सामना जिंकणारा संघ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक २०२६ या स्पर्धेचा विजेता होणार आहे.
भारताने आतापर्यंत पाच वेळा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे. भारतीय संघाने २०००, २००८, २०१२, २०१८ आणि २०२२ हे विश्वचषक जिंकले आहेत. यामुळे यंदा जिंकल्यास भारत सहाव्यांदा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकाचा विजेता होणार आहे.
भारताच्या साखळी फेरीतील सामन्यांचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध अमेरिका - १५ जानेवारी २०२६ - बुलावायो
- भारत विरुद्ध बांगलादेश - १७ जानेवारी २०२६ - बुलावायो
- भारत विरुद्ध न्यूझीलंड - २४ जानेवारी २०२६ - बुलावायो
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकासाठीचा भारतीय संघ : आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, एरॉन जॉर्ज, वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंह, आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, मोहम्मद ईनान, हेनिल पटेल, देवंद्रन दीपेश, किशन कुमार सिंह आणि उधव मोहन.






