मुंबई : दरवर्षी नवीन तंत्रज्ञान आणि सुधारित मॉडेल्स बाजारात आणताना Apple काही जुनी उत्पादने बंद करत असते आणि यंदा हा बदल अधिक व्यापक स्वरूपात पाहायला मिळत आहे. यात आयपॅड, अॅपल वॉच आणि मॅक या सर्व प्रमुख कॅटेगरीतील मॉडेल्सचा समावेश आहे. २०२५ मध्ये बंद करण्यात आलेल्या या उत्पादनांची जागा नवीन आणि अधिक प्रगत मॉडेल्सने घेतली असून, Apple ने अधिक मॉडर्न प्रोडक्टस विकण्यावर भर दिला आहे.
SE आणि प्लस मॉडेल्सना निरोप
यंदा आयफोन एसई सीरिजमध्ये सर्वात मोठा बदल करण्यात आला असून ही संपूर्ण सीरिज बंद करण्यात आली आहे. एसई मॉडेल्सची जागा आता आयफोन १६ ई ने घेतली आहे. याशिवाय आयफोन १४ प्लस आणि आयफोन १५ प्लस ही दोन्ही मॉडेल्सही बंद करण्यात आली आहेत. प्लस व्हेरिएंट्सना निरोप देत Apple ने अल्ट्रा-पातळ आयफोन एअर या या नव्या संकल्पनेसह मॉडेल्स बाजारात आणले आहेत.
२०२५ मध्ये एकूण सात आयफोन मॉडेल्स निवृत्त करण्यात आली आहेत. यामध्ये आयफोन १६ प्रो मॅक्स, आयफोन १६ प्रो, आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १४, आयफोन १४ प्लस आणि आयफोन एसई यांचा समावेश आहे. या सर्व मॉडेल्सची जागा आता आयफोन १७ प्रो मालिकेने घेतली आहे.
आयपॅडच्या काही मॉडेल्सना ब्रेक
Apple ने यंदा आयपॅड लाइनअपमध्येही बदल करत काही जुनी मॉडेल्स बंद केली आहेत. एम ४ चिपसह आयपॅड प्रो, एम २ चिपसह आयपॅड एअर आणि १०व्या पिढीचा स्टँडर्ड आयपॅड या मॉडेल्सना निरोप देण्यात आला आहे. नवीन चिपसेट आणि सुधारित परफॉर्मन्ससह Apple ने आयपॅड रेंज अधिक सुसंगत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Apple Watch मधील बदल
२०२५ मध्ये Apple Watch अल्ट्रा २, Apple Watch सीरिज १० आणि Apple Watch एसई २ ही मॉडेल्स बंद करण्यात आली आहेत. या मॉडेल्सच्या जागी कंपनीने Apple Watch Series ११ सादर केली असून, भारतीय बाजारपेठेवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे.
मॅक लाइनअपमध्ये मोठा फेरबदल
मॅक कॅटेगरीमध्येही Apple ने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नवीन कॉन्फिगरेशन सादर झाल्यानंतर M2 मॅक्स आणि M2 अल्ट्रा चिप्ससह मॅक स्टुडिओ बंद करण्यात आला आहे. तसेच M4 चिपसह १४-इंच मॅकबुक प्रो निवृत्त करण्यात आला आहे. याशिवाय M3 चिपसह १३-इंच आणि १५-इंच मॅकबुक एअर मॉडेल्स, तसेच जुना M2 बेस्ड १३-इंच मॅकबुक एअरही कंपनीने आपल्या लाइनअपमधून हटवला आहे.
एकूणच, २०२५ मध्ये Apple ने जुन्या मॉडेल्सना निरोप देत नव्या पिढीच्या उत्पादनांवर स्पष्टपणे भर दिला असून, आगामी काळात अधिक हलकी, वेगवान आणि कार्यक्षम उपकरणे ग्राहकांसमोर आणण्याचा संकेत दिला आहे.






