Saturday, December 27, 2025

स्वीकृत सदस्यत्वासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’

स्वीकृत सदस्यत्वासाठी आतापासूनच ‘फिल्डिंग’

चार ठिकाणी १० नगरसेवकांना संधी

गणेश पाटील पालघर : जिल्ह्यातील तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत ४ नगराध्यक्षांसह ९४ नवे नगरसेवक निवडून आले आहेत. आणि आता याच नगर परिषद, नगरपंचायतीमध्ये स्वीकृत १० सदस्यांची ( नगरसेवक) निवड केली जाणार आहे. त्यामुळे थेट निवडणुकीतून नाही जमले, मात्र स्वीकृत सदस्य म्हणून तरी पालिकेत जाता यावे यासाठी, अनेकांनी आपापल्या राजकीय नेत्यांकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये नामनिर्देशित सदस्य निवडण्याबाबत त्यांची पात्रता आणि नियुक्त्या करण्याची पद्धत शासनाने ठरवून दिली आहे. त्यानुसार नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्य संख्येच्या दहा टक्के किंवा ५ यापैकी जी संख्या कमी असेल तितके स्वीकृत सदस्य नगर परिषद किंवा नगरपंचायतीमध्ये निवडल्या जातात. या नियमानुसार पालघर नगर परिषदेच्या ३० नगरसेवकांच्या संख्येनुसार या ठिकाणी ३ स्वीकृत सदस्य निवडल्या जातील. डहाणू नगर परिषदेमध्ये एकूण २७ नगरसेवकांच्या संख्येनुसार दहा टक्के हे प्रमाण २.७ येते.

दरम्यान, एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ही संख्या पॉइंट ५ पेक्षा जास्त आल्यास त्याठिकाणी पूर्ण संख्या विचारात घेण्यात येते. त्यामुळे डहाणू नगर परिषदेमध्ये सुद्धा ३ स्वीकृत सदस्य निवडल्या जाणार आहेत. असेच गणित वाडा नगरपंचायतीला लागू पडते. परिणामी वाडा नगरपंचायतीमध्ये १७ नगरसेवक असल्याने येथे सुद्धा २ स्वीकृत सदस्य निवडावे लागणार आहेत. जव्हार नगर परिषदेच्या नगरसेवकांची संख्या २० असल्याने या ठिकाणी २ स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. नव्या नगराध्यक्षासह नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ दिवसांच्या आत पहिली सर्वसाधारण सभा घ्यावी लागते. याच सभेत नगर परिषद उपाध्यक्षांची निवड करावी लागते. तसेच स्वीकृत सदस्यांची नावे देखील याच सभेत जाहीर केल्या जातात. तथापि, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगराध्यक्षांची नावे राजपत्रात प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर २५ दिवसाच्या आत पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. पहिल्या सर्वसाधारण सभेची तारीख निश्चित झाल्यानंतर त्या सभेच्या २४ तास पूर्वी राजकीय पक्ष, आघाडी किंवा गटाकडून स्वीकृत सदस्याचे नाव नामनिर्देशित करावे लागणार आहे. संबंधित नावांची छाननी जिल्हाधिकाऱ्यांकडून केली जाते. आणि पात्र नावे सभेचे पिठासीन अधिकारी म्हणजेच नगराध्यक्षांकडे पाठविले जातात. या अनुषंगाने नरसेवक होण्याची इच्छा असणाऱ्यांनी स्वीकृत सदस्य म्हणून पालिकेत जाण्यासाठी आपल्या नेत्यांकडे 'फील्डिंग' लावायला सुरुवात केली आहे.

स्वीकृत सदस्य निवडीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती

तीन नगर परिषद आणि एका नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्य निवड प्रक्रिया करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी चार अधिकाऱ्यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पालघर नगर परिषदेसाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी शाम मदनुरकर, डहाणू करिता सहा. जिल्हाधिकारी विशाल खत्री, जव्हार करिता सहा.जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आणि वाडा नगरपंचायतीसाठी वाडा उपविभागीय अधिकारी संदीप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्वीकृत सदस्यांचे नामनिर्देशन स्वीकारण्यासाठी जिल्हा प्रशासन अधिकारी श्याम पोशेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Comments
Add Comment