तिरुपती : तिरुपती येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी लोकसंख्या, ज्ञान आणि भारताच्या भविष्यातील भूमिकेबाबत मोठं आणि चर्चेत राहणारं विधान केलं आहे. भारताला जागतिक महासत्ता बनायचं असेल, तर देशातील लोकसंख्या, कौशल्य आणि पारंपरिक मूल्यांची योग्य सांगड घालणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुले असावीत, असा सल्ला दिला.
'इंडियन्स सायन्स काँग्रेस'मध्ये बोलताना नायडू यांनी लोकसंख्येला भारताची सर्वात मोठी ताकद असल्याचं सांगितलं. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या विचारांशी सहमती दर्शवत, जर भारतातील तरुणांची क्षमता योग्य दिशेने आणि राष्ट्रीय उद्दिष्टांशी जोडली गेली, तर भारताला जगातील सर्वोच्च शक्ती बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या भाषणात त्यांनी १९६१ मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठाचंही कौतुक केलं. भारतीय संस्कृती, परंपरा आणि सभ्यतेचा वारसा जपण्याचं काम हे विद्यापीठ करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताची बौद्धिक आणि शास्त्रीय ताकद नवीन नाही, हे सांगताना नायडू यांनी इतिहासातील अनेक उदाहरणांचा उल्लेख केला. ४५०० वर्षांपूर्वीची प्रगत नगररचना, तक्षशिला आणि नालंदा यांसारखी विद्यापीठं, गणित, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, अध्यात्म आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्राचीन भारताचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं.
आर्थिक भवितव्य
भारताच्या आर्थिक भवितव्याबाबत बोलताना नायडू यांनी आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ, तसेच परदेशात कार्यरत असलेल्या भारतीयांच्या उच्च उत्पन्नाकडे लक्ष वेधलं. १९९१ च्या आर्थिक सुधारणांनंतर भारताने घेतलेली झेप पाहता, लवकरच भारत जगातील दुसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि २०४७ पर्यंत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गंगा–कावेरी नदी जोड प्रकल्प
संसाधन नियोजनावर बोलताना त्यांनी राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पाचं समर्थन केलं. गंगा–कावेरी नदी जोड प्रकल्प हे देशाचं दीर्घकाळाचं स्वप्न असल्याचं सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्राधान्यक्रमात जलसुरक्षेला महत्त्व दिलं जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर्व राज्यांनी परस्पर सहमतीने हा प्रकल्प राबविल्यास शेती, उद्योग आणि एकूणच विकास प्रक्रियेला चालना मिळेल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, लोकसंख्या नियंत्रणावर देशभरात चर्चा सुरू असताना, लोकसंख्या वाढीच्या समर्थनार्थ करण्यात आलेलं हे विधान भविष्यातील लोकसंख्याशास्त्रीय लाभांश लक्षात घेऊन केल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. विकसित भारत २०४७ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुण पिढीची संख्या महत्त्वाची असल्याचं या विधानातून स्पष्ट होत आहे.






