लोणावळा : महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी देवस्थान (Ekvira Devi Karla) ट्रस्टमध्ये गेल्या काही काळापासून गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा दावा खुद्द देवस्थानचे पुजारी गणेश देशमुख यांनी केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पुराव्यांसह ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. देवीच्या चरणी येणाऱ्या दानावर डल्ला मारला जात असल्याचे समोर आल्याने भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पुजारी गणेश देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार, भक्तांनी देवीला अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तूंमध्ये मोठी अफरातफर करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, देवस्थानच्या मालकीची गाडी ट्रस्टच्या कामाऐवजी स्वतःच्या खासगी आणि राजकीय कामांसाठी वापरली जात असल्याचा ठपकाही अध्यक्षांवर ठेवण्यात आला आहे. "देवीच्या संपत्तीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला जात आहे," असा खळबळजनक आरोप देशमुखांनी केला आहे.
तिरुवनंतपुरम: भारतीय महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर टी 20 मध्येही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे. काल झालेल्या भारत विरूद्ध ...
व्हीआयपी दर्शनाचा 'बनावट पावती' स्कॅम!
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या व्हीआयपी भक्तांची होणारी लूट. देवस्थानच्या अधिकृत यंत्रणेला बगल देऊन बनावट पावती पुस्तके छापण्यात आली असून, त्याद्वारे भाविकांकडून रोख रक्कम उकळली जात असल्याचा दावा पुजाऱ्यांनी केला आहे. हा एक मोठा आर्थिक घोटाळा असून यामध्ये अनेक जण सामील असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व गैरव्यवहारांबाबत पुजारी गणेश देशमुख यांनी पुणे धर्मदाय आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. कोट्यवधी रुपयांची ही अफरातफर उघड करण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे कार्ला गडावर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली असून, देवस्थानच्या प्रशासनावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
"राजकीय हेतूने बदनामी," दीपक हुलावळे यांचे स्पष्टीकरण
प्रसिद्ध कार्ला एकवीरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. ट्रस्टच्या अध्यक्षांवर करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या अफरातफरीच्या आरोपांनंतर राजकीय आणि धार्मिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, आता या सर्व प्रकरणावर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी आपली मौन सोडले असून, हे सर्व आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील तक्रारदार पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत आरोपांची सरबत्ती केली होती. "देवस्थानच्या मालकीच्या महागड्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर गाड्यांचा वापर देवीच्या कामासाठी होण्याऐवजी अध्यक्षांकडून वैयक्तिक आणि राजकीय फायद्यासाठी केला जात आहे," असा दावा त्यांनी केला होता. गाडीच्या गैरवापरासोबतच सोन्या-चांदीच्या दागिन्यांमधील अफरातफर आणि बनावट पावत्यांचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आपल्यावर होत असलेल्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देताना दीपक हुलावळे यांनी ठाम भूमिका घेतली आहे. "माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला अद्याप कोणतीही अधिकृत नोटीस किंवा माहिती मिळालेली नाही. सध्या निवडणुकांचे वातावरण असल्याने जाणीवपूर्वक ही चिखलफेक केली जात आहे," असे हुलावळे यांनी म्हटले आहे. तसेच, योग्य वेळ आल्यावर सर्व पुराव्यानिशी आपण माध्यमांसमोर आपली बाजू मांडू, असे स्पष्टीकरण देत त्यांनी तूर्तास अधिक बोलणे टाळले आहे.