Saturday, December 27, 2025

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

बीसीसीआयकडून धोनीला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन

मुंबई : १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतरही धोनीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ‘कॅप्टन कूल’ला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन देण्यात येत आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आपल्या माजी खेळाडूंच्या सन्मानार्थ व त्यांच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी पेन्शन योजना राबवते. २०२२ मध्ये या योजनेत मोठी सुधारणा करण्यात आली, ज्यामुळे पेन्शनच्या रकमेत वाढ झाली आहे. २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला दरमहा ७० हजार रुपये पेन्शन मिळते. माजी कसोटी क्रिकेटपटूला दरमहा ६० हजार रुपये, प्रथम श्रेणी क्रिकेटपटू दरमहा ३० हजार रुपये व महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटुला दरमहा ५२ हजार ५०० रुपये पेन्शन दिली जाते. धोनीने कारकिर्दीत ९० कसोटी सामने, ३५० एकदिवसीय सामने व ९८ टी-२० सामने खेळले आहेत. नियमांनुसार, ज्या खेळाडूंनी २५ पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत, त्यांना सर्वोच्च पेन्शन मिळते. या निकषानुसार, बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला ७० हजार रुपये पेन्शन देते.

धोनीची संपत्ती १ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. आयपीएल २०२५ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून खेळला, ज्यासाठी त्याला ४ कोटी रुपयांचा करार मिळाला आहे. कसोटी सामने, एकदिवसीय सामने तसेच क्रिकेटमधील योगदानाबद्दल मिळणारा हा पेन्शनचा निधी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या सन्मानाचे प्रतीक मानला जातो.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा