बँकॉक : थायलंड–कंबोडिया संघर्षादरम्यान चिनी बनावटीच्या रॉकेट सिस्टिमचा फायरिंगवेळी भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत कंबोडियाच्या आठ जवानांचा मृत्यू झाला आहे. “चले तो चाँद तक नही, शाम तक” ही म्हण चिनी वस्तूंप्रमाणेच चिनी शस्त्रास्त्रांनाही लागू होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
कंबोडियाने थायलंडच्या दिशेने हल्ला करण्यासाठी मल्टी-बॅरल रॉकेट लॉन्चर सिस्टिमचा वापर केला होता. यंत्रणेतून सलग सहा रॉकेट डागण्यात आली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण रॉकेट सिस्टिमचा अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात आठ सैनिक ठार झाले, तर काही जण गंभीर जखमी झाले.
सदर रॉकेट सिस्टिम ही चीनने १९८० च्या दशकात रशियन BM-२१ ग्रॅडची नक्कल करून विकसित केलेली PHL-८१ प्रणाली असल्याचे सांगितले जाते. युद्धाच्या सुरुवातीलाच कंबोडियाने या सिस्टिमच्या जोरावर थायलंडला धमकी दिली होती. मात्र प्रत्यक्षात हीच सिस्टिम कंबोडियाच्याच जवानांसाठी प्राणघातक ठरली.
चिनी शस्त्रांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानकडील चिनी एअर डिफेन्स सिस्टिम भारताच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रासमोर निष्प्रभ ठरल्या होत्या. त्यामुळे चिनी संरक्षण साहित्याच्या दर्जावर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.