Friday, December 26, 2025

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

शॉर्टमध्ये सांगितलेली बेकेट थिअरी

भालचंद्र कुबल, पाचवा वेद

हल्ली अँटीसिपेटेड कथानकांचा एवढा कंटाळा आलाय ना की समजा नाटक बघताना तुमच्या बाजूच्या सीटवर दोन बायका शेजारी शेजारी बसलेल्या असतील तर पुढलं कथानक तुम्हाला बघण्याची गरज नसते, ते आधीच ऐकायला येतं. बरं गम्मत म्हणजे तुम्हालाही तेच वाटत असतं जे त्या दोघींना वाटतंय... आणि हाईट म्हणजे लेखकालाही तेच सांगायचं असतं जे तुम्हा तिघांनाही अपेक्षित आहे. १९८० ते २००० च्या द्विदशकात अनेक इंग्रजी चित्रपट "बेकेट थिअरी"वर आधारलेले बघायला मिळत होते. बेकेट थिअरी म्हणजे जॉं आनुई या फ्रेंच नाटककाराने लिहिलेल्या दोन व्यक्तिरेखांच्या संघर्षाची, नात्यांची, नैतिक-अनैतिक स्वभाव वैशिष्ये मांडणारा स्टोरी प्लॉट. वेटिंग फॉर गोदो वाल्या सॅम्युअल बेकेट आणि त्याच्या 'थिएटर ऑफ द अॅब्सर्ड'चा काहीही संबंध इथे नाही. दोन्ही संदर्भ पाश्चात्त्य नाटकाशी संबंधित आहेत म्हणून फक्त नमूद करतोय कारण बेकेट या नावात साधर्म्य आहे. तर या बेकेट थिअरीमधे दोन भिन्न तत्त्व मांडणाऱ्या व्यक्तिरेखा परस्परांच्या विरोधात लेखकाने उभ्या केल्या की पहावा लागणारा संघर्ष जाम इंटरेस्टिंग असतो. जागतिक करमणूक इंडस्ट्री आजवर या बेकेट थिअरीवरच उभी आहे असं माझं मत आहे. अगदी पट्कन आठवतील अशी उदाहरणं म्हणजे सामना, नमक हराम, शक्ती, मशाल अगदी माहेरची साडी सारखे चित्रपट तर अश्रूंची झाली फुले, बेईमान सारखी मराठी नाटके हीच थिअरी कॅरी करतात. स्टर क्रेझी (१९८०), 'ट्रेडींग प्लेसेस'(१९८३), 'दर्टी राॅटन स्काऊंड्रल्स'(१९८८), प्लेन-ट्रेन्स-अँड ऑटोमोबिल्स (१९८७), विकेंड अॅट बर्नी (१९८९), डंब अॅंड डंबर (१९९४), टॉमी बॉय (१९९६), व्हाईट मेन कांट जम्प (१९९२), रश अवर (१९९८) असे कित्येक इंग्रजी चित्रपट विविध विषयांना घेऊन या वीस वर्षांच्या कालावधीत निर्माण झाले आणि बऱ्यापैकी हिट झाले. पुढे कथानकातील दोन परस्पर विरोधी व्यक्तिरेखांचा एक फाॅर्म्युला बनला आणि त्या अानुषंगाने जी थिअरी समोर आली त्यालाच "बेकेट थिअरी" म्हणावे लागेल. भारतीय नाट्यलेखन शैली मात्र एककेंद्री किंवा समाजकेंद्री व्यक्तिरेखेभोवती व्यक्त होत राहिली. अर्थात त्याला कारणीभूत असलेल्या रामायण, महाभारत या महाकाव्याचा, वेद-उपनिषदांचा जबरदस्त पगडा होय. त्यामुळे व्यक्ती-व्यक्तींमधील समांतर एक-प्रतलीय संघर्ष आपल्या नाट्यशैलीत क्वचितच आढळून येतो. अर्थातच दोन प्रोटॅगोनिस्टना एकमेकांविरुद्ध खेळवणारी कथानके ही उधार उसनवारी केल्याप्रमाणे मराठी नाटक-सिनेमांमधून पहायला मिळतात. नाटककाराने कितीही ठासून सांगितलं नाही हे माझं अभिनव लेखन आहे तरी त्याची पाळमुळं बेकेट थिअरीच्या संदर्भांमधेच सापडतात. नुकतेच प्रदर्शित झालेलं "शंकर जयकिशन" हे नाटक या थिअरीमध्ये चपखल बसते म्हणूनच हे नमनाला घडाभर तेल. नाटकाबाबत लिहिताना, वाचकांना वरवरची स्टोरी सांगा आणि मुळात हे नाटक बघायचे की नाही, ते सांगा, एवढ्याच काय ते, या कंटेटचे (लेखांचे) महत्त्व 'समीक्षा' म्हणून उरलंय. तेंव्हा हा मजकूर पुढे न वाचताही "शंकर जयकिशन" डोळे झाकून पाहायला काहीच हरकत नाही. दोन सशक्त अभिनेते या नाटकाच्या निमित्ताने समोरा समोर उभे ठाकतात आणि अख्ख्या थिएटरला आपल्या कवेत सामावून घेतात. महेश मांजरेकरांना बऱ्याच वर्षांनी म्हणजे 'डॉक्टर तुम्हीसुद्धा' मधे बघताना जो फ्रेशनेस जाणवायचा, अजूनही तोच आणि तस्साच टिकून आहे. पोट मात्र बरंच सुटलंय परंतु वेशभूषेने ते शिताफीने लपवलंय. भरत जाधवना हल्लीच अस्तित्व या त्यांच्याच प्रॉडक्शनमधे बघितलं होतं त्यामुळे ते आऊट ऑफ साईट झालेले नाहीत मात्र मांजरेकरांना जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे २९ वर्षांनी पहाणं खरंच एन्टरटेनिंग आहे. नाटकाच्या नावात असलेल्या शंकर जयकिशन या संगीतकाराचा आणि कथानकाचा सुतराम संबंथ नाही. भरत जाधवानी रंगवलेल्या महादेव या व्यक्तिरेखेच्या आवडीचा संगीतकार, एवढाच काय तो शंकर जयकिशनचा संबंध...! आणि मग तो संबंध एस्टॅब्लिश व्हावा यासाठी मधे मधे पेरलेली सिच्युएशनल गाणी म्हणजे "ठिकै" असं मनातल्या मनात दुर्लक्ष करत, भरत आणि महेश यांच्या अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करायला लावणारी ही "वेल फॅब्रिकेटेड कॉमेडी" आहे. नाच मेरी जान या मेहमूदच्या "मै सुंदर हूँ" या चित्रपटातल्या गीताने मात्र थोडेफार हास्यफवारे उडवण्याचे काम चोख केलंय. मला आपलं एक सहज नेपथ्याबाबत वाटून गेलं होतं की शंकर जयकिशनचा डायहार्ड फॅन असलेला महादेव, संगम, झुक गया आसमान, आँखो आँखो में, मैं सुंदर हूँ किंवा नाटकाच्या कथानकाशी टायटल जुळणार्या एखाद्या चित्रपटाचे पोस्टर, आपल्या ड्रॉईंग हॉलमध्ये का लावणार नाही? महादेवचे परंपरांना, आठवणींना घट्ट धरुन ठेवणारे स्वभाव वैशिष्ट्य अधिक अधोरेखित झाले असते, असे काहीसे वाटून जाते. कायैना... बाप-मुलीमध्ये असलेल्या वादाचा तिढा, बापाच्या कधी काळच्या मित्राने येऊन सोडवण्याच्या कथानकाचे हे नाटक, इतका साधा सरळ स्टोरी प्लॉट..! तो देखील एक्स्पेक्टेड आणि अॅंटीसिपेटेड प्रसंगानी ठासून भरलेला. फक्त मुव्हर्स आणि पॅकर्स या नव्या एलिमेंटचा वापर करून घेतल्याने दिग्दर्शकीय परिभाषा थोडी आधुनिक वाटते. उदा. कोरोगेटेड बॉक्समधून भरत जाधवांची एन्ट्री, रिकाम्या हॉलमध्ये घुमणारा आवाज, सतत मधे मधे येणारा व्हास जो महादेवच्या बायकोचे अस्तित्व दाखवत रहातो ह्या मुव्हमेंट्समधून नव्या पिढीच्या दिग्दर्शकांचा संहितेकडे बघण्याचा दृष्टिकोण स्पष्ट होतो मात्र वरच्या मजल्यावरुन खाली येणारे जोगदंडबाईंचे परकर व साड्या, 'बाहुमुद्रा' या आंगिक अभिनयशैलीने चिंगीशी केलेला संवाद अशा अनेक दिग्दर्शकीय क्लृप्त्यांची प्रेक्षकांना आता सवय झालीय. त्यात काहीच नावीन्य राहिलेले नाही. बाहुमुद्रा अभिनयशैली म्हणजे दोन नटांनी मागेपुढे उभे राहून मागच्या नटाने पुढल्याच्या काखेत हात घालून संवादानुरुप हातवाऱ्यांनी व्यक्त होणे. चार्ली चॅप्लीन यांनी तब्बल चार चित्रपटातून 'बाहुमुद्रा'चा वापर केला होता. असो, परंतु यामुळे नाटक उलट खुसखुशीत होण्यासच मदत होते. पहिला अंक तर इतका क्रिस्पी आणि वेगवान झालाय की तो 'संपला?' असे विचारावेसे वाटते. बऱ्याच ठिकाणी, दोन दिग्गजांची जुगलबंदी असं नाटकाच्या प्रमोशनमधे वाचायला, ऐकायला, बघायला मिळतंय पण जाधवांना चान्स असून, प्रसंग असून देखील मांजरेकर प्रभावी ठरतात. गाणी गातात. मधल्या एक-दोन गाण्यांना टाळ्या देखील घेतात. फक्त वर उल्लेखिल्याप्रमाणे डोळे झाकून मांजरेकरांचा अभिनय 'पाहिल्यास' जड-घोगऱ्या आवाजाचा मकरंद अनासपुरे बोलतोय की काय? असा भास होतो. संजय पेठेकडे जेव्हा मी या नाटकाचे फोटो मागितले तेव्हा शाम चव्हाणांच्या प्रकाशयोजनेला त्याने सुंदर काॅम्प्लिमेंट दिली. केवळ प्रकाश योजनेतल्या लाईट इंटेन्सिटीमुळे छान फोटो आलेत. प्रकाश योजनेला फारसा वाव या नाटकात नाही तरीही आपले अस्तित्व यात शाम चव्हाणांनी दाखवून दिले आहे. संगीतकार अजित परब यांचे योगदान सुद्धा विसरून चालणार नाही कारण शंकर जयकिशन यांच्या म्युझिकल ट्रॅक्सना रिअरेंज करणे सोपे नाही. काही काही इमोशनल प्रसंगात ते ट्रॅक्स वाजतात आणि ते लक्षात आणून देतात की तुम्ही पहात आहात "शंकर जयकिशन". या सर्व दिग्गजांच्या गदारोळात संयत अभिनयाने लक्ष वेधून घेते ती शिवानी रांगोळे. भरत जाधवांसोबत इमोशनल सीन असो वा महेश मांजरेकरांसोबतचा थट्टा मस्करीचा, शिवानी कुठेही कमी पडत नाही. थोडक्यात 'शॉट' मध्ये सांगायचं झाल्यास या वर्षातली एक वेल रिहर्सड मेजवानी भरत जाधव एन्टरटेनमेंट या नाट्यसंस्थेने रसिक प्रेक्षकांना दिली आहे. जरूर पाहा...!

Comments
Add Comment