नाशिक शहरातील द्वारका चौक होणार वाहतूक कोंडी मुक्त शहर
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून नाशिक शहरात २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील वाढती वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने नाशिकमधील महत्त्वाच्या द्वारका चौक सुधारणा प्रकल्पास २१४ कोटी रुपये इतक्या भरीव तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
द्वारका चौक हा नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीचा महत्त्वाचा चौक असून, मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते, बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच औद्योगिक व व्यापारी भाग यांना जोडणारा प्रमुख वाहतूक केंद्रबिंदू आहे. त्यामुळे येथे सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. कुंभमेळ्याच्या काळात देश-विदेशातून येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
या सुधारणा प्रकल्पाअंतर्गत आधुनिक पद्धतीने चौकाचे पुनर्रचना, उड्डाणपूल/ग्रेड सेपरेटर, सेवा रस्ते, सिग्नल यंत्रणा, पादचारी सुविधा तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी आवश्यक सोयी-सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल, मालवाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि आपत्कालीन सेवांची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढेल, तसेच प्रवाशांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.
नाशिकच्या द्वारका सर्कल येथील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सुटावी यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला होता. अनेकदा या ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या. वेळोवेळी बैठकांद्वारे तसेच पत्राद्वारे शासनाचे लक्ष लेधले होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने नाशिकच्या विकासाच्या दृष्टीने या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
या मंजुरीमुळे द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसह नाशिककरांनाही दीर्घकालीन उपाययोजना होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असून नाशिक शहरातील कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.






