मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा एकदा रोहित शर्माच्या देशभक्तीची झलक पाहायला मिळाली असून, ‘हिटमॅन’चा एक भावूक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये व्यस्त आहे. मात्र व्यस्त क्रिकेट वेळापत्रक असूनही त्याने आपल्या कुटुंबासाठी वेळ काढत मुलगी समायराच्या शाळेतील वार्षिक कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली. याच कार्यक्रमादरम्यान घडलेला एक क्षण सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शाळेच्या वार्षिक सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात देशभक्तीपर गाण्यांचाही समावेश होता. कार्यक्रमात जेव्हा लता मंगेशकर यांनी अजरामर केलेले ‘ए मेरे वतन के लोगो…’ हे गीत सादर करण्यात आले, तेव्हा वातावरण भारावले होते.
व्हिडीओच्या सुरुवातीला मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हेही गाणं ऐकत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर कॅमेरा रोहित शर्माकडे वळतो आणि त्याच क्षणी रोहित भावूक झालेला पाहायला मिळतो. गाण्याचे शब्द कानावर पडताच रोहितच्या डोळ्यांत अश्रू तरळू लागतात. तो आपले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतो, मात्र त्याचे डोळे डबडबलेले आणि लाल झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.
‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणं सुरू असताना रोहित शांतपणे बसून ते ऐकत होता. हा क्षण पाहून अनेक चाहत्यांना भारताच्या टी-२० वर्ल्ड कप विजयानंतरचा तो प्रसंग आठवल्याशिवाय राहिला नाही, जेव्हा रोहित शर्माने तिरंगा हातात घेऊन मैदानात विजयाचा जल्लोष केला होता.
या देशभक्तीपर गाण्याने रोहितला पुन्हा एकदा भावूक केलं असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. चाहत्यांकडून रोहितच्या देशप्रेमाचं कौतुक केलं जात असून, ‘हिटमॅन’चा हा भावूक क्षण अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे