Friday, December 26, 2025

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

मुंबई महापालिका निवडणुकीकरता प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण

सोमवार २९ डिसेंबरपासून कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५- २६ च्या निवडणुकीसाठी  महानगरपालिका अधि‍कारी व कर्मचारी यांचा मास्टर प्रशिक्षण कार्यक्रम (प्रशिक्षकांचे प्रशिक्षण)  २६ डिसेंबर २०२५) संपन्न झाला.आज प्रशिक्षण घेतलेले अधिकारी दिनांक २९ डिसेंबर २०२५ पासून सुरू होणाऱया प्रशिक्षण कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देतील.महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५- २६ साठी १० हजार २३१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून जवळपास ६४ हजार ३७५ अधिकारी आणि कर्मचारी यांना एकूण सात केंद्रांवर तीन सत्रांमध्ये सकाळी ०९ ते ११,  दुपारी १२ ते २ तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील पेंग्विन कक्ष सभागृह येथे आयोजित या प्रशिक्षणाला अतिरिक्त  आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक)  विजय बालमवार आणि विशेष कार्य अधिकारी (अतिक्रमण निर्मूलन, म्हाडा)  संदीप कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या सूचनेनुसार, ईव्हीएम यंत्र हाताळणी, ईव्हीएम यंत्रांची सुरक्षितता राखणं, मतदान साहित्य हाताळणी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱयांच्या सुलभतेसाठी मतदानाच्या प्रत्येक टप्प्यावर करावयाची कामे, मतदानाआधी चाचणी मतदान (मॉक पोल), मतदानपूर्व कामकाजाचे नियोजन, मतदार ओळखपत्र तपासणे, ईव्हीएम यंत्र सील करणे यासोबतच प्रत्यक्षात मतमोजणीच्या दिवशी नेमून दिलेल्या कर्तव्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
दरम्यान, महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक २९ डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ दरम्यान पार पडणार  आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण  ५ जानेवारी ते  ८ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे.  महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५- २६ साठी १० हजार २३१ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून जवळपास ६४ हजार ३७५ अधिकारी आणि कर्मचारी यांना एकूण सात केंद्रांवर तीन सत्रांमध्ये सकाळी ०९ ते ११,  दुपारी १२ ते २ तसेच दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी एका केंद्रांवर ५ याप्रमाणे सात केंद्रावर ३५ प्रशि‍क्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
ज्याठिकाणी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली त्यामध्ये शहर विभागातील कर्मचाऱ्यांसाठी ना. म. जोशी मार्ग महानगरपालिका शाळा येथील तळमजला, भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय येथील अण्णाभाऊ साठे सभागृह तसेच शीव रुग्णालयातील मुख्य सभागृह, पश्चिम उपनगरातील कर्मचाऱ्यांसाठी बोरिवली (पश्चिम) येथील प्रबोधन ठाकरे नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाचे सभागृह, वांद्रे (पश्चिम) येथील पटवर्धन पार्कच्या बाजुला असलेले बालगंधर्व सभागृह येथे तसेच पूर्व उपनगरातील कर्मचाऱ्यांसाठी मुलुंड (पश्चिम) येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलाजवळील महाकवी कालिदास नाट्यगृह अशा एकूण सात ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण देण्यात येणाऱया कर्मचाऱ्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी आणि मदतनीस यांना प्रशि‍क्षण देण्यात येणार आहे.
Comments
Add Comment