काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही
उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार कसरत
मुंबई : उबाठा आणि मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसने मुंबईत स्वबळाचा नारा देऊन ठाकरे बंधूंची अडचण केली. हिंदू मतदार भाजप आणि महायुतीकडे वळले, तरी अल्पसंख्याक मतांच्या जोरावर किमान ३० जागा जिंकून विरोधी पक्षनेतेपद तरी पदरात पाडून घेता येईल, अशी त्यांची रणनिती होती. मात्र, निवडणूक जाहीर होऊन १० दिवस लोटले, तरी मुंबईतील जवळपास ३० प्रभागांमधून काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यास एकाही कार्यकर्त्याने तयारी दाखवलेली नाही. उर्वरित प्रभागांमधून जे अर्ज आले, त्यातील निवडून किती येतील, हे कोडेच आहे. त्यामुळे स्वबळाचा नारा देऊन पश्चातापाची वेळ काँग्रेसवर आली आहे.
मुंबई काँग्रेस कार्यालयात आतापर्यंत एकूण ६७० इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत अर्ज दाखल केले आहेत. यापैकी ६०१ अर्ज हे सर्वसाधारण, महिला, ओबीसी आणि ओबीसी महिला प्रवर्गातून आले असून, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून केवळ ६९ अर्ज दाखल झाले आहेत. मात्र या आकडेवारीआड लपलेली खरी बाब म्हणजे मुंबईतील ३० हून अधिक प्रभागांमध्ये काँग्रेसच्या वतीने लढण्याची इच्छा एकानेही व्यक्त केलेली नाही.
भांडुप विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ११२, घाटकोपर पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १३२, तसेच घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील १२६, १२७, १२८, १२९ आणि १६० या सर्व प्रभागांमध्ये काँग्रेसकडे अद्याप एकाही इच्छुकाने अर्ज केलेला नाही. मानखुर्द–शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १३७ आणि विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील १११ व ११७ या प्रभागांमध्येही उमेदवार शोध सुरू आहे. या भागात मराठी बहुल मतदार असूनही काँग्रेसला मिळत असलेली नापंसती, हे पक्षासाठी चिंतेचे कारण आहे. स्थानिक पातळीवर पकड कमकुवत झाल्याने, इच्छुक उमेदवार पुढे येण्यास तयार नसल्याचे या आकडेवारीवरून दिसते.
उत्तर मुंबईत स्थिती गंभीर : बोरिवली विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १३, १४ आणि १५, चारकोप विधानसभा क्षेत्रातील १९, २१ आणि ३०, तसेच दहिसर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग ६ मध्ये एकाही इच्छुकाने काँग्रेसकडे अर्ज केलेला नाही. या भागात मराठी बहुल पट्टा असून, काँग्रेसला येथे उमेदवार शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी याबाबत व्यक्त केलेल्या चिंतेनुसार, बूथ पातळीवरील कमकुवत नेटवर्क आणि नेतृत्वाच्या अभावामुळे ही स्थिती उद्भवली आहे. उत्तर-पश्चिम मुंबईत अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १२१ आणि जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ५२ व ७३ या प्रभागांमध्येही काँग्रेसकडे इच्छुक उमेदवार नाहीत. मध्य मुंबईत चेंबूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १५३, सायन–कोळीवाडा विधानसभा क्षेत्रातील १७२ व १७३ आणि वडाळा विधानसभा क्षेत्रातील प्रभाग १७७ येथेही हीच परिस्थिती आहे. या भागात विविध जाती-जमातींचे मतदार असून, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून आलेले कमी अर्ज हे देखील काँग्रेसच्या संघटन बांधणीवर प्रश्न उपस्थित करतात.
दक्षिण मुंबईत उमेदवार मिळेना : दक्षिण मुंबईत तर काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट दिसते. मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील प्रभाग २१९, शिवडी विधानसभा क्षेत्रातील २०३, तसेच वरळी विधानसभा क्षेत्रातील १९६, १९८ आणि १९९ या प्रभागांमध्ये सध्या काँग्रेसकडे एकही इच्छुक उमेदवार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर इच्छुकांचा अभाव असणे हे कमकुवत बूथ नेटवर्क, स्थानिक नेतृत्वाचा अभाव आणि निर्णय प्रक्रियेतील गोंधळाचे द्योतक आहे. दक्षिण मुंबईतील हे प्रभाग उच्चभ्रू आणि मिश्र मतदार असलेले असून, काँग्रेसला येथे प्रभावी उमेदवार शोधणे आव्हानात्मक ठरू शकते.






