टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कॅनडामधील टोरंटो विद्यापीठाजवळ एका भारतीय वंशाच्या विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवांक अवस्थी असे या २० वर्षीय विद्यार्थ्याचे नाव आहे. शिवांक हा भारतीय असून शिक्षणासाठी तो कॅनडामध्ये गेला होता. तो कॅनडाच्या सर्वात मोठ्या असलेल्या टोरंटो विद्यापीठात शिक्षण घेत होता. या प्रकरणामुळे आता विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या इतर भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुळचा भारतीय असलेल्या शिवांकची हत्या २३ डिसेंबर रोजी झाली. घटनेच्या दोन दिवसानंतर टोरंटो पोलिसांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, २३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांच्या सुमारास पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी पोलिसांना शिवांक मृतावस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. टोरंटो मधील भारतीय दूतावासाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे.
दरम्यान, शिवांकच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वी ३० वर्षीय हिमांशी खुराना या भारतीय तरुणीचीही हत्या करण्यात आली होती. ही घटना १९-२० डिसेंबर रोजी घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. टोरंटो पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १९ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १०:४१ वाजता स्ट्रॅचन अव्हेन्यू आणि वेलिंग्टन स्ट्रीट वेस्ट परिसरात बेपत्ता व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर शनिवारी सकाळी ६:३० वाजता पोलिसांना एका निवासस्थानी हिमांशी खुरानाचा मृतदेह सापडला. घटनास्थळी तपास केल्यानंतर पोलिसांनी हा मृत्यू खून असल्याचे जाहिर केले.
मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई दिसून येत आहे. बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या कलाकारांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. ...
शिवांक अवस्थी हा टोरंटो विद्यापीठात 'लाइफ सायन्स'चे शिक्षण घेत होता. तो तृतीय वर्षात शिकत होता. विद्यापीठाच्या चीअरलिडिंग टीमचा तो सदस्य होता. शिवांकच्या हत्येनंतर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. एक हसतमुख मित्र गमावल्याचे विद्यार्थ्यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर, टोरंटो येथील भारतीय कॉन्सुलेट जनरलचे अधिकारी शिवांकच्या कुटुंबियांच्या संपर्कात असून त्यांना शक्य ती मदत करत असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये टोरंटोमधील हा ४१ वा खून आहे. अशा घटनांमध्ये सतत वाढ होत असल्याने, कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.