मुंबई : बहुचर्चित मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर भाजप १४० आणि शिवसेनेने ८७ जागा लढवण्याचा निर्णय झाल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.
या निर्णयामुळे महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश मुंबईत होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. राष्ट्रवादीला मुस्लिमबहुल प्रभागातील १०-१५ जागा हव्या होत्या, मात्र भाजपच्या आक्षेपामुळे आणि जागावाटपाच्या मर्यादेमुळे राष्ट्रवादीला मुंबईतून बाहेर ठेवण्यात आले आहे. अंतिम सूत्रानुसार मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी भाजप १४० जागा लढवणार असून, शिवसेनेला ८७ जागा मिळणार आहेत. रिपाइं आणि रिपब्लिकनसेनेसह छोट्या मित्रपक्षांनाही काही जागा सोडल्या जाणार आहेत.
भाजप-शिवसेनेत गेल्या काही आठवड्यांपासून जागावाटपाच्या चर्चा सुरू होत्या. पहिल्या फेरीत भाजपने शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी हा प्रस्ताव नाकारत १२५ जागांची मागणी लावून धरली होती. त्यानंतर भाजपने त्यांना ७२ जागांचा नवा प्रस्ताव दिला. त्यालाही शिवसेनेने नकार दिला. अलीकडील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील निकालांमुळे शिवसेनेची बॅर्गेनिंग पॉवर वाढली. या निवडणुकीत भाजप पहिला मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर राहिली. परिणामी, मुंबईतील जागावाटपात त्यांना सन्मानजनक वाटा मिळाला.
प्रतिनिधी: लोकांमध्ये गुंतवणूकीबाबत वाढलेली जनजागृती, वाढलेली उत्पादक गुंतवणूक समज व वाढलेले उत्पन्न व वाढलेल्या गुंतवणूकीबाबत आकर्षण वाढलेले ...
छोट्या मित्रपक्षांना मिळणार वाटा
महायुतीतील छोटे मित्रपक्षही या जागावाटपात समाविष्ट आहेत. रामदास आठवले यांच्या रिपाइंला (आरपीआय) भाजपच्या कोट्यातून जागा सोडल्या जाणार आहेत. तर, आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला शिवसेनेच्या कोट्यातून काही जागा दिल्या जाणार आहेत.
राष्ट्रवादी महायुतीत नाही?
राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत महायुतीत स्थान मिळण्याची अपेक्षा होती. पक्षाने मुस्लिमबहुल २५ प्रभागांपैकी १०-१५ जागांची मागणी केली होती. मात्र, नवाब मलिकांवर भाजप नेत्यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे राष्ट्रवादीला मुंबईतून दूर ठेवण्यात आले.






