Saturday, January 3, 2026

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

वनविभागाच्या कारवाईमुळे कल्याणमधील ४०० कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर

आपत्कालीन सेवांचा मार्ग खुंटला

कल्याण : मांडा–टिटवाळा पूर्वेकडील विद्यामंदिर शाळेजवळील रस्ता पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. वनविभागाच्या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. नवश्री सिद्धीविनायक आणि सह्याद्री को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीजवळील मुख्य रस्ता, जो सोसायटीत ये-जा करण्यासाठी वापरला जात होता, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश आखाडे यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आला. वनविभागाने म्हटले आहे की, सोसायटीजवळील जागा त्यांच्या अखत्यारित येते आणि तिथे अनधिकृत बांधकामे वाढत असल्याचा आढावा घेतला गेला.

त्यामुळे वनजमिनीचे संरक्षण करण्यासाठी रस्ता बंद करण्याची आवश्यकता असल्याचे अधिकारी म्हणाले. तथापि, स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की हा रस्ता सुमारे ४०० कुटुंबांसाठी अत्यावश्यक आहे. रस्त्याद्वारे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, पाणी टँकर आणि कचरा संकलन करणारी वाहने ये-जा करत असतात.

रस्ता अचानक बंद झाल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा काळजीचा आवाज नागरिकांनी उठवला आहे. स्थानिकांनी यापूर्वीच वनविभागाकडे लेखी अर्ज सादर केला असून, रस्ता पूर्णपणे बंद न करता वाहतुकीसाठी नियंत्रित पद्धतीने खुला ठेवण्याची मागणी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, अनधिकृत बांधकाम रोखणे आवश्यक असले तरी त्यासाठी संपूर्ण रस्ता बंद करणे योग्य उपाय नाही; नियमन करून रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवता येऊ शकतो.

याबाबत बोलताना वन अधिकारी निलेश आखाडे यांनी स्पष्ट केले की, ही जागा वनविभागाच्या अखत्यारित असून वाहनांसाठी रस्ता ठेवणे शक्य नाही. नागरिकांच्या मागणीचा विचार करता फक्त पादचाऱ्यांसाठी पायवाट ठेवली जाईल, परंतु वाहनांना ये-जा करण्याची परवानगी दिली जाणार नाही. वनविभागाचा निर्णय आणि स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे मांडा–टिटवाळा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सोसायट्यांचे अर्ज, रहिवाशांच्या तक्रारी आणि संभाव्य धोके लक्षात घेता प्रशासन या समस्येवर योग्य तोडगा काढेल की नाही, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment