Friday, December 26, 2025

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

घट्ट करा मान, थंड करा मस्तक अन् ऐका दारावरची दस्तक; बिग बॉस मराठीच्या नव्या प्रोमोची जोरदार चर्चा

बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनची चर्चा सुरू असतानाच स्पर्धेचा अधिकृत प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बिग बॉस मराठीचा नवा सीझन ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये नव्या सीझनबाबत उत्सुकता दिसून येत आहे. या उत्सुकतेचे अजून एक कारण म्हणजे यावर्षी सुद्धा 'महाराष्ट्राचा दादा' म्हणजे रितेश देशमुख या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणार आहे. दरम्यान हा सीझन कोण उचलून धरणार आणि कोण हार मानणार याबाबत माध्यमांवर चर्चांना उधाण आले आहे.

बिग बॉसच्या नव्या सीझनचा प्रोमो रितेश देशमुखच्या आवाजातील 'दार उघडणार ,नशिबाचा गेम पालटणार' या दमदार थीमसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या थीमवरून प्रेक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. परंतु या वर्षीचा खेळ हा फक्त खेळापुरता मर्यादित नसून तो थीमनुसार नशीब पालटणारा असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोण जिंकणार, कोण हरणार आणि कोण टिकणार हे सगळं पाहायला प्रेक्षकवर्गाची आतुरता वाढत चालली आहे.

प्रोमो प्रसिद्ध होताच रितेश देशमुखच्या कोड्यातून गेम आणि घराची थीम सांगणाऱ्या प्रभावी संवादाने प्रेक्षकांचे लक्ष्य वेधले आहे. मात्र आतापर्यंत आलेल्या छोट्या-छोट्या क्लिपमधून रितेशने प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. कधी नवा लुक, तर कधी वेगवेगळे सरप्राइझ, वेगळी स्टाईल तर कधी खास अंदाजामधून रितेश समोर आला आहे. अशाप्रकारे यंदाच्या सीझनची थीम आगळ्यावेगळ्या पद्धतीतून प्रेक्षकांच्या समोर आणण्याकरिता एका हटके लुकमध्ये रितेश दिसत आहे. ‘फॅन्सचा जीव जडला, की ते पाठ नाही सोडत आणि आपण शब्द दिला की मागे नाही हटत” तर "याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ" अशा कडक शब्दांत रितेश भाऊंनी हा सीझन धुरळा करणार असल्याचे सांगितले आहे.

शेकडो दारखिडक्यांनी सजलाय घराचा जंगी थाट, दारापल्याडचं सरप्राइज ठरवेल प्रत्येकाची वाट; यामुळे डाव हा कधीही पालटू शकतो , असा ठाम इशारा ही प्रोमोमधून दिला आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्र प्रचंड आतुरतेने या नव्या सीझनची वाट पाहतोय. घर नक्की कसं दिसणार, नक्की काय सरप्राइझेस असणार आणि क्षणात डाव कसा बदलणार? हे प्रश्न सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

Comments
Add Comment