ठाणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकीचा नारा दिला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर कडवे विरोधक बनलेले शरद पवार गट आणि अजित पवार गट आता विजयासाठी एकत्र येण्याचे संकेत देत आहेत. दोन्ही गटांनी सांगितले की, आघाडीचा प्रस्ताव आला तर वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार केला जाईल, त्यामुळे निवडणुकीत आघाडीच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचे दोन गट निर्माण झाले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाची साथ दिली आहे, तर माजी खासदार आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांचा गट अजित पवार यांचा पाठिंबा करतो. एकेकाळी कट्टर समर्थक म्हणून ओळखले गेलेले हे नेते आता फुटीनंतर कडवे विरोधक बनले, मात्र आता ऐक्याचा सूर लावला जात आहे.
ठाण्यातील राबोडी, कळवा आणि मुंब्रा भागांमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार गट महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवत असून, कळवा-मुंब्रा भागात बहुसंख्या जागा सोडल्या जाणार आहेत. अजित पवार गटाने स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “आमदार जितेंद्र आव्हाड हे आमचे शत्रू नाहीत. ३० तारखेपर्यंत प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवून त्यावर विचार करू. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणणे हे महत्त्वाचे आहे. ठाणे शहरात पक्ष वाढवायचा असेल तर आता विचार करावा.”
त्यावर राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान म्हणाले, “अजित पवार गटही आमचा दुश्मन नाही. जर आघाडीचा प्रस्ताव आला तर तो वरिष्ठांकडे पाठवू. निवडणूक आधी की नंतर एकत्र येणे बघू, पण निवडणुकीपूर्वी एकत्र आले तर पक्षाची ताकद दिसेल.” सध्या या आश्वासक विधानांमुळे ठाणे महापालिका निवडणुकीत दोन्ही गटांच्या आघाडीच्या शक्यतेची चर्चा जोरात सुरू झाली आहे.