Friday, December 26, 2025

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी कर्नाटकमधील कारवार बंदरात येतील. तिथून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीत बसून चार दिवस प्रवास करतील. या कालावधीत राष्ट्रपती गोवा, कर्नाटक आणि झारखंडमधील वेगवेगळ्या भागात जाऊन तिथे सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. राष्ट्रपती मूर्मू यांच्या आधी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती असताना १३ फेब्रुवारी २००६ रोजी आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथून पाणबुडीत बसून प्रवास केला होता. तर पाणबुडीतून प्रवास करण्याआधी राष्ट्रपती मुर्मू यांनी याच वर्षी २९ ऑक्टोबर रोजी राफेल आणि २०२३ मध्ये सुखोई ३० एमकेआय या दोन लढाऊ विमानांतून प्रवास केला आहे.

राजधानीतून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ डिसेंबर रोजी गोव्यासाठी रवाना होतील, तिथून राष्ट्रपती २८ डिसेंबर रोजी कर्नाटकमधील उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या कारवार बंदरात पोहोचतील. कारवार बंदरात उभ्या असलेल्या पाणबुडीतून राष्ट्रपती पुढे चार दिवस प्रवास करतील. या प्रवासादरम्यान राष्ट्रपती वेगवेगळ्या भागात काही तासांसाठी थांबून सरकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू सोमवारी २९ डिसेंबर रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे ओल चिकी लिपीच्या शताब्दी सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

संथाली या प्रादेशिक भाषेसाठी रघुनाथ मुर्मू यांनी १९२५ मध्ये ओल चिकी नावाची लिपी तयार केली. या घटनेला १०० वर्षे झाल्याच्या निमित्ताने विशेष सोहळा होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे या कार्यक्रमाआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली आहे. भारताचे संविधान संथाली भाषिकांसाठी ओल लिपीत छापले जाईल, असे अमित शहांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम होत आहे. जमशेदपूरमध्येच सोमवारी एनआयटीच्या १५ व्या दीक्षांत समारंभालाही राष्ट्रपती संबोधित करणार आहेत. राष्ट्रपती मंगळवार ३० डिसेंबर रोजी झारखंडमधील गुमला येथे आंतरराज्य जनसांस्कृतिक समागम सोहळ्यातील कार्तिक जत्रेला संबोधित करणार आहेत.

Comments
Add Comment