Friday, December 26, 2025

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी निमनिर्देशनपत्र सादर करताना उमेदवारांनी शपथपत्र / घोषणापत्र मराठी भाषेतच भरायला हवे, असा आग्रह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याच्या तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून उमेदवारांना नामनिर्देशनपत्र आणि शपथपत्र इंग्रजी भाषेत सादर करण्याची मुभा असल्याचे स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत अपत्यांसंदर्भात, गुन्हेगारी पार्श्वभूमी, स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशीलाबाबत शपथपत्र / घोषणापत्र सादर करावे लागते. मात्र नामनिर्देशनपत्र आणि त्यासोबत सादर करावे लागणारे शपथपत्र / घोषणापत्र इंग्रजी भाषेत सादर करावे, असा आग्रह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याच्या काही तक्रारी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे.

उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्रासोबत शपथपत्र / घोषणापत्राचा मराठी आणि इंग्रजी भाषेतील नमुना विहित करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना मराठी अथवा इंग्रजी यापैकी कोणत्याही भाषेतून नमुन्यात शपथपत्र / घोषणापत्र सादर करण्याची मुभा द्यावी, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अवर सचिव नि. ज. वागळे यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता उमेदवारांना इंग्रजी भाषेतही शपथपत्र / घोषणापत्र सादर करता येणार आहे.

अनेक अमराठी उमेदवारांना निवडणुक अर्ज भरताना नामनिर्देशनपत्र तसेच शपथपत्र सादर करताना आता निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे भाषेची अडचण निर्माण होणार नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा